३० तास अखंड गायन : ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद

जागतिक विक्रमाची प्रमाणपत्रे सुलक्षणा सावंत व दत्ताराम चिमुलकर यांच्याकडे सुपूर्द करताना ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’च्या मुख्य संपादक सुषमा नार्वेकर व सूरज नार्वेकर. सोबत नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, विश्वंभर गावस, सुभाष मळीक, रवींद्र भवनचे संचालक व कर्मचारी.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : साखळी रवींद्र भवन व पद्मिनी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नादब्रह्म’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सलग ३० तास उपशास्त्रीय गायन सादर करण्यात आले. या जागतिक विक्रमाची नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये साखळी रवींद्र भवन व पद्मिनी फाऊंडेशनच्या नावावर करण्यात आली आहे. ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’च्या मुख्य संपादक सुषमा नार्वेकर व व्यावसायिक प्रमुख सूरज नार्वेकर यांनी या जागतिक विक्रमाची घोषणा केली.
२६ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात उपशास्त्रीय गायनाच्या सादरीकरणाला प्रारंभ झाला होता. सोमवारी दिवस-रात्र व मंगळवारी मुख्य सभागृह व खुल्या जागेतील व्यासपीठावर सलग उपशास्त्रीय म्हणजेच भजन, अभंग, भक्तीगीत आदींची बरसात करण्यात आली. गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या गायक व वादक कलाकारांनी सुरांची बरसात करत रात्र गाजवली. दोनही दिवस कालाकारांमध्ये जोश दिसून आला. एकूण ३० तासांचे सादरीकरण झाले. या सादरीकरणात ६७ पुरुष, ८३ महिला गायक, २४ हार्मोनियम वादक, २१ तबलापटू, ५ पखवाजवादक व एक मंजिरीवादक अशा एकूण २०१ कलाकारांनी सहभाग घेतला. सुमारे साडेतीनशे भक्तीगीते सादर करण्यात आली. विशेष म्हणजे एकही गीत पुन्हा गायिले जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावून सहभागी कलाकारांचे कौतुक केले.
या सादरीकरणासाठी साखळी रवींद्र भवनतर्फे संचालक दिनकर घाडी व स्नेहा देसाई यांच्यावर जबाबदारी दिली होती. या सोहळ्यात रवींद्र भवनच्या कर्मचारीवर्गाने मोलाची साथ दिली. उद्घाटन सोहळ्यात प्रज्वलित करण्यात आलेली समई सुमारे ३२ तास तेवत राहिली. विक्रमी सादरीकरणानंतर प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्याला पद्मिनी फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, सुषमा नार्वेकर व सूरज नार्वेकर, संचालक दिनकर घाडी, शोधन कोळमुळे, सुनील फाळकर, स्नेहा देसाई, रविराज च्यारी, विश्वंभर गावस, सुभाष मळीक, रवींद्र भवनचे कर्मचारी उपस्थित होते. रवींद्र भवनने बजावलेली कामगिरी मोठी आहे. समर्पित कलाकारांमुळेच विश्वविक्रम साध्य होऊ शकला, असे सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.