अंजुणे धरणाजवळील अपघातात युवतीचा मृत्यू, सहाजण जखमी

महाराष्ट्रात देवदर्शन करून गोव्यात परतताना स्वयंअपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
32 mins ago
अंजुणे धरणाजवळील अपघातात युवतीचा मृत्यू, सहाजण जखमी

वाळपई : चोर्ला घाटात अंजुणे धरणाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात देवदर्शन करून गोव्यात परत येताना हा अपघात घडला.

दि. २७ जानेवारी रोजी पहाटे ४.२९ वाजता वाळपई पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. सहाय्यक उपनिरीक्षक रघुनाथ गावस यांच्या तक्रारीनुसार, दि. २७ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास केरी–सत्तरी येथील अंजुणे धरणाजवळ (बीसीपी केरीपूर्वी) स्वयंअपघात झाला.

अक्कलकोट येथून गोव्यातील पर्वरी असा प्रवास करत मारुती सुझुकी कार (क्र. जी.ए.-०३-झेड-०७९२) घेऊन चालक नंदकुमार ऊर्फ गोपाळ नाईक (६०, रा. साल्वादोर दो मुंद, आल्तो पर्वरी) हे करीत होते. त्यांचा गाडीवरील ताबा सुटून कार रस्त्याच्या उजव्या बाजूच्या मातीच्या उतारावर आदळली. वाहनात एकूण सहा प्रवासी होते. या अपघातात सर्व सहाजण जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. यातील स्नेहल तनाजी घातेगस्ती (२७, रा. वड्डी मेर्शी, सांताक्रूझ) हिला साखळी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात पाठविण्यात आला आहे. वाळपई पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक खुशाली नाईक हे या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.