कुंडईतील दोन, मडकईतील एक कारखाना सील

कोल्हापूर पोलिसांची कारवाई; आमदाराच्या दारू कंपनीच्या नावाचे बनविले बनावट बॉक्स

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
34 mins ago
कुंडईतील दोन, मडकईतील एक कारखाना सील

फोंडा : कुंडईहून कोल्हापूर येथे दारू घेऊन जाणारा एक ट्रक कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून, या ट्रकमधील दारूच्या बॉक्सवर असलेल्या नावामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. महाराष्ट्रातील एका आमदाराच्या दारू कंपनीच्या नावाचे बनावट बॉक्स तयार करून दारूची वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूर पोलिसांनी कुंडईतील केनस व अन्य एक कारखान्यासहित मडकईतील एक कारखाना सील केला आहे.

गेल्या मंगळवारी कोल्हापूर येथे दारू घेऊन जाणारा एक ट्रक पोलिसांनी पकडला होता. ट्रकमधील बॉक्सची तपासणी केली असता त्यावर महाराष्ट्रातील एका आमदाराच्या दारू कंपनीचे नाव आढळून आले. यासंबंधी अधिक चौकशी केली असता अज्ञात व्यक्तींनी बनावट नावाने दारूची वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाची तक्रार संबंधित आमदाराने केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तातडीने दखल घेत गुरुवारी पाच पथके कुंडई येथे दाखल केली. सर्वप्रथम केनस येथील कारखान्यावर छापा टाकण्यात आला. तेथे आमदाराच्या कंपनीच्या नावाचे बनावट बॉक्स तयार केले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथील कामगारांना ताब्यात घेऊन कारखाना गुरुवारी रात्री उशिरा सील केला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी तपास अधिक तीव्र करत कुंडईतील आणखी एक आणि मडकई येथील एक कारखाना सील करण्यात आला.

केनस कंपनीच्या मालकाचा शोध सध्या कोल्हापूर पोलीस घेत असून, गोव्यातील इतर औद्योगिक वसाहतींमध्येही बॉक्स तयार करणाऱ्या कारखान्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, गोव्यातील राजकीय नेत्यांशी मैत्री असलेल्या या कारखान्याच्या मालकाला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची शोधमोहीम शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होती.

बेकायदेशीररित्या कारखाना सुरू केल्याचे उघड

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केनस या कारखान्याला स्थानिक पंचायतीकडून घराच्या नावावर ईएचएन क्रमांक देण्यात आला होता. मात्र, राजकीय नेत्यांशी मैत्री असलेल्या मालकाने वीज व पाण्याची जोडणी घेऊन बेकायदेशीररित्या कारखाना सुरू केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी लवकरच ग्रामसभेतही आवाज उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा