बेतालभाटी येथील २०१९ मधील प्रकरण

पणजी :२०१९ मध्ये बेतालभाटी येथे आईने आपल्या दोन वर्षीय मुलीचा खून केला होता. याप्रकरणी आई अाझिया रॉड्रिग्ज हिने आधीच सुमारे सहा वर्षे सहा महिने तुरुंगवास भोगला आहे. तिच्या मानसिक आरोग्याची स्थिती लक्षात घेता तिला तुरुंगात ठेवणे उपयोगी ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने संशयित राॅड्रिग्ज हिला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणी कोलवा पोलिसांनी १७ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. संशयित अाझिया यांनी स्वतः पोलीस स्थानकात जाऊन दोन वर्षे चार महिन्यांच्या मुलीला गुदमरवून ठार मारल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घराकडे धाव घेतली असता, मुलगी पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला दाखल होताच मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आझिया विरोधात गुन्हा दाखल १८ सप्टेंबर २०१९ रोजी अटक केली.
आझियाचे वकील कौतुक रायकर यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी हा खटला समाप्त होण्यास उशीर होणार आहे. या प्रकरणात ३६ साक्षीदार असून आतापर्यंत १५ साक्षीदारांची न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच दीर्घ काळाची कैद व मानसिक आरोग्याची गंभीर स्थिती यांचा विशेष उल्लेख करून तिला जामीन देण्याची मागणी केली.
या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतली. आईने सहा वर्षे सहा महिने तुरुंगवास भोगला असून तिच्या मानसिक आरोग्याची स्थिती लक्षात घेता तिला पुढे कैदेत ठेवणे उपयोगी ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवून तिला जामीन मंजूर केला.