उच्च न्यायालयात सुनावणी : निष्काळजीपणाचा आरोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण

पणजी : कोठंबी-पाळी, डिचोली येथील महिलेचा प्रसूतीनंतर ४१ वर्षीय महिलेचा २०२३ मध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरोधातगंभीर निष्काळजीपणाचा प्राथमिक आरोपही सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द केला. याबाबतचा आदेश न्या. आशिष चव्हाण यांनी दिला.
या प्रकरणी मूळ तक्रार कोठंबी-पाळी, डिचोली येथील प्रज्ञा परब हिचे पती दर्शन परब यांनी दाखल केली होती. त्यानुसार, प्रज्ञाला प्रसुतीसाठी कुटुंबियांनी म्हापशातील सदर खासगी हॉस्पिटलमध्ये २२ डिसेंबर २०२३ रोजी दाखल केले होते. तिने २७ डिसेंबर २०२३ रोजी दोघा जुळ्या बाळांना जन्म दिला होता. या प्रसुती दरम्यान हॉस्पिटलकडून तिची व्यवस्थित काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली व तिला बांबोळीतील गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले. तिथे उपचारावेळी तिचे निधन झाले. या घटनेला खासगी इस्पितळातील डाॅक्टर जबाबदार असल्याचा दावा करून दर्शन परब यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. तसेच प्रज्ञा हिच्या पतीने केलेली तक्रार गोमेकॉच्या रिड्रेसल समितीकडे वर्ग केली होती. समितीचा अहवाल आल्यावर दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी कायदा विभागाचे संयुक्त सचिव ज्ञानेश्वर राऊत देसाई यांच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रितम मोपकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, डाॅ. मोपकर यांच्यातर्फे अॅड. कॅरोलिन कुलासो यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. राजू पोवळेकर आणि साहिल लवंदे यांनी साथ दिली. या प्रकरणी याचिकादारांचा कोणताही निष्काळजीपणा नसल्याचा युक्तिवाद मांडला. तसेच या संदर्भात सर्व वैद्यकीय माहिती न्यायालयात सादर केली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील गुन्हा रद्द केला.
गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका
गुन्हा रद्द करण्यासाठी वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रितम मोपकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी राज्य
सरकार, कायदा विभागाचे संयुक्त सचिव ज्ञानेश्वर राऊत देसाई, मृत प्रज्ञा परब यांचे पती दर्शन परब आदींना प्रतिवादी केले होते.