तिघांवर पोलीस स्थानकावर हल्ल्याचे आरोप

पणजी : ११ मार्च रोजी पणजी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या गुन्हेगारी खटल्यांची माहिती घेतली असता, चार उमेदवारांवर खटले सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील तिघांवर पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केल्यासंदर्भात तर एका उमेदवारावर एसटी, एससी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी मतदान ११ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतर १३ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. भाजप समर्थित बाबूश मोन्सेरात पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आमी पणजेकार’ पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. यात ६९ उमेदवार रिंगण्यात आहेत. त्यातील भाजप समर्थित बाबूश पॅनलच्या चार उमेदवारांवर गुन्हा दाखल असून या गुन्ह्यांची विविध न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
सर्वाधिक तीन गुन्हे प्रभाग क्रमांक १३ मधील उमेदवार तथा माजी महापौर उदय मडकईकर यांच्या विरोधात दाखल झाले आहेत. त्यांच्या विरोधात २०१४ मध्ये पणजी पोलीस स्थानकावर हल्ला संदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाने आरोप निश्चित करून सुनावणी सुरू केली आहे. तसेच पणजी मार्केट मधील एका दुकानदाराची ६० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील खटला सुरू आहे. याशिवाय मारहाण व धमकी संदर्भातील गुन्ह्याचा खटला प्रथमवर्ग न्यायालयात सुरू आहे.
प्रभाग क्रमांक २ मधील उमेदवार कारोलीन पो यांच्या विरोधात पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केल्या संदर्भातील खटला न्यायालयात सुरू आहे. त्यात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक १८ मधील उमेदवार कृष्णा शिरोडकर यांच्या विरोधात पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केल्या संदर्भातील खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत खटला
प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवार प्रसाद आमोणकर यांच्या विरोधात २०२४ मध्ये डिचोली पोलीस स्थानकात एसटी एससी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाला. या प्रकरणातील सुनावणी मेरशी येथील सत्र न्यायालयात सुरू अाहे. तसेच न्यायालयाने २१ मार्च २०२५ रोजी खटल्याची दखल घेऊन सुनावणी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.