
म्हापसा : गिरी बार्देश येथे राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक ओलांडताना जनरेटरवाहू महिंद्रा जीपची धडक बसल्याने आनंद नारायण धारवाडकर (७७, रा. एकतानगर म्हापसा, मूळ गवळी तिठा, सावंतवाडी) हा वृद्ध पादचारी ठार झाला.
अपघात शनिवार, दि. २४ रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. आनंद हे टिकलो पेट्रोलपंप आवारातील मोबाईल टॉवरस्थळी सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला होते.
पेट्रोल संपल्याने महामार्गाच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या दुचाकीकडे आनंद हे महामार्ग ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी परेश हळर्णकर (पर्वरी) हा जीए ०३ पी ८०२० या क्रमांकाच्या महिंद्रा जीपद्वारे पॉवर जनरेटर ओढून नेत होता.
या जीपला आनंद हे आदळून जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस हवालदार प्रणेश गावस यांनी पंचनामा केला.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलीस व रॉबर्ट पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.