जादा व्याजाच्या आमिषाने १.६९ कोटींची फसवणूक

पणजी : जादा व्याजाचे आमिष दाखवून १.६९ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) पुणे येथील हरिओम मल्टीस्टेट सहकारी पतपुरवठा सोसायटी लि.सह अध्यक्ष शिवाजी जाधव याला अटक केली आहे. त्याला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
या प्रकरणी माया हरीजन यांच्यासह विल्मा फर्नांडिस, आयजॅक डिसोझा, चैतन्य प्रकाश ऑडिच्या आणि इतरांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वरील सहकारी पतपुरवठा सोसायटीचे पुण्यात मुख्यालय असून त्यांनी २०१६ मध्ये गोव्यात पाटो येथे शाखा उघडली. त्यासाठी त्यांनी गोव्यात शाखा प्रमुख व इतर कर्मचारी तसेच स्थानिक एजंटाची भरती केली. त्यानंतर गोव्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कायम ठेव व इतर योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार, तक्रारदारांनी सोसायटीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. याच दरम्यान कायम ठेव व इतर योजनेची मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी जमा केलेली रक्कम काढण्यासाठी सोसायटीकडे संपर्क साधला असता, ती बंद असल्याचे समोर आले.
गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ईओसीत तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी वरील सोसायटीसह, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर संचालकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२० व १२० बी आणि २२ अनियमित ठेव योजनेवर बंदी घालण्याचा कायदा २०१९ (बीयुडीएस)अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान मुख्य सूत्रधार तथा सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांची माहिती मिळाली. त्यानुसार, ईओसीचे अधीक्षक अर्शी अादिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी संशयित जाधव याला अटक केली. संशयिताला मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.