
म्हापसा : येथील कदंब बसस्थानकावर अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांच्यावर पाच जणांच्या गटाने शनिवारी हल्ला केला. ताम्हणकर यांना धावत्या दुचाकीवरून पाडण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
म्हापसा बसस्थानकावरून काही खासगी बसवाले अवैधरित्या प्रवासी बस वाहतूक करत असल्याच्या प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी सुदीप ताम्हणकर हे काही प्रसारमाध्यमांसह घटनास्थळी आले होते. पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर ताम्हणकर हे आपल्या दुचाकीने जात असताना, त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना गाडीसह जमिनीवर पाडण्यात आले. याप्रकरणी, ताम्हणकर यांनी म्हापसा पोलिसांत पाच जणांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीनुसार, पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा इस्पितळात दाखल केले. यानंतर पोलिसांनी ताम्हणकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार संशयितांना अटक केली.
सुदीप ताम्हणकर यांनी आरोप केला आहे की, एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस योग्य नोंदणीशिवाय बेकायदेशीरपणे आंतरराज्य प्रवासी वाहतूक करत आहेत. याच मुद्द्यावर आपण आवाज उठवत असल्यामुळे आपल्यावर हा हल्ला करण्यात आला.
पाठलाग करून मला मारहाण
हल्लेखोरांनी माझा पाठलाग करून मला मारहाण केली, दुचाकीवर लाथ मारली आणि माझे तसेच गाडीचे फोटो काढले. मी केवळ बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात आवाज उठवत होतो. तरीही माझ्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना समाजातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे, असे सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
कुणीही कायदा हातात घेऊ नये : मुख्यमंत्री
सुदीप ताम्हणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल. तसेच कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न न करता आवश्यक प्राधिकरणाकडे निवेदन द्यावे, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. हल्ल्यानंतर ताम्हणकर यांनी साखळी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.