१२ फेब्रुवारीला फेटाळला होता जामीन

म्हापसा : हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे मालक लुथरा बंधूंनी जामिनासाठी पुन्हा उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. १२ फेब्रुवारी रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला होता.
दरम्यान, म्हापसा पोलिसांनी नोंद केलेल्या बनावट आरोग्य दाखला प्रकरणी सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असून न्यायालयाने ही सुनावणी १३ मार्च पर्यंत तहकूब केली आहे.
दरम्यान, साकवाडी हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री बर्च क्लबमध्ये घडलेल्या या भीषण आग दुर्घटनेत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. तर सहाजण जखमी झाले होते. मृतांमध्ये ५ जण पर्यटक तर २० क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या प्रकरणात हणजूण पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. तर एकूण १४ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या १०५, १२५, १२५(अ), १२५(ब), २८७, ३३८, ३३६(३), ३४०(२), ६१(२), २३८, २४१, ३(७) व ३(५) कलमान्वये न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.
दरम्यान, बर्च बाय रोमिओ लेनचे सहमालक अजय गुप्ता यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून ही सुनावणी १२ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.