कोलवाळ कारागृहात दोघा कैद्यांकडून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न

चप्पलमध्ये लपवलेला ३४४ ग्रॅम गांजा जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31 mins ago
कोलवाळ कारागृहात दोघा कैद्यांकडून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न

म्हापसा : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळातून वैद्यकीय तपासणी करून कोलवाळ कारागृहात परतणाऱ्या दोघा कैद्यांकडे ३४४ ग्रॅम गांजा सापडला आहे. हा ड्रग्ज संशयित कैद्यांनी आपल्या चप्पलमध्ये लपवला होता.

याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अंडरट्राईल कैदी दिलीप साहा व मोहम्मद सलमान या दोघांविरुद्ध ड्रग्ज प्रतिबंधक तसेच तुरूंग कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. कैदी साहा याच्या चप्पलमध्ये १५ हजार रुपये किमतीचा १४३ ग्रॅम तर कैदी मोहम्मद याच्या चप्पलमध्ये २० हजारांचा २०१ ग्रॅम गांजा सापडला.

गोमेकॉमध्ये या कैद्यांनी आपली चप्पले बदलली आणि त्याजागी त्यांनी वरील गांजाची पाकिटे घालून शिवलेली चप्पले घातली. मात्र, कारागृहाच्या फ्रिस्कींग पॉइंटवर आरआरबी पोलीस पथकाच्या तपासणीमध्ये हा ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आला.

ही घटना बुधवारी ११ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सकाळी कैदी दिलीप साहा व मोहम्मद सलमान यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी एस्कॉर्ट विभागाच्या पोलिसांनी गोमेकॉमध्ये नेले होते. तिथून कारागृहात परतल्यावर तुरुंगाच्या मुख्य फाटकावर सदर कैद्यांची तपासणी करण्यात आली. आयआरबी पोलीस पथकाला त्यांनी घातलेल्या चप्पलांच्या बाबतीत संशय आला. ही चप्पले शिवलेली होती. आयआरबी पोलिसांनी चप्पलांचा शिवलेला भाग उघडला असता आतमध्ये गांजा आढळून आला.

तुरुंग प्रशासनाला याबाबतची माहिती देताच अधिकाऱ्यांनी हा गांजा ताब्यात घेतला. सायंकाळी प्रशासनाने तक्रारीसह कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन हा गांजा केला. पोलिसांनी वरील कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.


हेही वाचा