गोव्याहून आलेल्या ट्रकमधून बेळगावात सापडला दुर्मिळ साप

‘वेटेकरचा बोआ’ सुरक्षितरित्या सोडला नैसर्गिक ​अधिवासात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
गोव्याहून आलेल्या ट्रकमधून बेळगावात सापडला दुर्मिळ साप

बेळगाव : गोव्याहून नारळ घेऊन येणाऱ्या एका ट्रकमधील गोणपाटाखाली लपलेला एक दुर्मिळ व बिनविषारी साप शनिवारी बेळगावमधील शनिवार खुट येथील एका नारळ व्यापाऱ्याच्या दुकानात आढळून आला.

ही घटना नारळ व्यापारी जसवंत गोरल यांच्या दुकानात घडली. साप दिसताच त्यांनी तात्काळ सर्पमित्र आनंद चिट्टी यांना याची माहिती दिली. चिट्टी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितरीत्या पकडले आणि परिसरातील नागरिकांना कोणताही धोका होऊ दिला नाही.

तपासणीनंतर हा साप वेटेकरचा बोआ असल्याचे निष्पन्न झाले. हा वाळवंटी बोआचा एक दुर्मिळ उपप्रकार असून सुमारे तीन वर्षांचा, २ फूट ८ इंच लांबीचा आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा साप बिनविषारी असून महाराष्ट्र ते केरळपर्यंतच्या किनारपट्टी भागात तो आढळतो.

‘दुतोंडी मांडुळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अंधश्रद्धेशी जोडल्या जाणाऱ्या सापासारखा दिसत असल्यामुळे या सापाचा गैरवापर तंत्रमंत्र किंवा अंधश्रद्धात्मक प्रकारांसाठी करण्यात आला असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आनंद चिट्टी यांनी सांगितले की या जखमांवरून सापाला पूर्वी पकडण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वन अधिकारी प्रशांत यांच्या सहकार्याने या दुर्मिळ सापाला नंतर गोवा सीमेवरील जंगल परिसरात, त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले.

वेटेकरचा बोआ साधारणपणे सैल माती, दगडधोंड्यांचे ढिगारे तसेच विटा-दगडांच्या राशींमध्ये वास्तव्य करतो. उंदीर, पाल व सरडे हे त्याचे मुख्य अन्न आहे. ही प्रजाती सहसा सहा ते सात पिल्लांना जन्म देते. मात्र, या सापाच्या शेपटीचा भाग कापलेला आणि तोंड बंद केलेले आढळून आल्याने तो यापूर्वी मानवी हस्तक्षेपाला बळी पडला असावा, अशी शंका वन्यप्रेमींनी व्यक्त केली.

हेही वाचा