सरकारी वकिलांचा युक्तिवाद : जामिनाला हरकत

म्हापसा : बर्च क्लबमधील उत्पन्नांचे आर्थिकदृष्ट्या अर्जदार संशयित लुथरा बंधू हे थेट लाभार्थी होते. त्यांनी आपल्या भागीदारासह आर्थिक फायद्यांसाठी क्लबच्या सुरक्षेशी तडजोड केली. हा व्यवसाय देखरेखीसाठी आम्ही विविध व्यवस्थापकांची नियुक्ती केल्याचे सांगून संशयित हे आपली नैतिक जबाबदारी झटकू शकत नाहीत, असा दावा करत सरकारी पक्षाने लुथरा बंधूंच्या जामीन अर्जाला हरकत घेतली.
म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर यांच्यासमोर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील जेनिफर सांतामारीया यांनी मंगळवारी युक्तिवाद करत जामीन अर्जाला विरोध केला. दुर्घटनेचा तपास हा प्राथमिक टप्प्यावर असून नवीन तथ्ये समोर येत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार अर्जदारांचे कर्मचारी असल्याने पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती असूनही संशयित फरार झाले होते. त्यामुळे ते पुन्हा पळून जाण्याची शक्यता आहे. आरोग्य अधिकार्यांच्या बनावट एनओसीच्या तक्रारी संदर्भातील तपास सुरू असून संशयित कायद्याचे पालन करणारे नागरिक नाहीत, असा दावा त्यांनी युक्तीवादावेळी केला.
क्लबचे कर्मचारी आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार, दुर्घटनेच्या दिवशी क्लबस्थळी अग्नीरोधक उपकरणे किंवा फायर अलार्म वाजले नव्हते. अर्जदारांचे इतरही क्लब-रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे जे दस्ताऐवज अग्निशमन उपकरणांबाबत दिले गेलेत, ते इतर ठिकाणांचे असू येतात.
दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी, लुथरांनी ट्रॅव्हल एजेंटशी संपर्क साधून विमानाचा दर विचारला होता. त्यांचा तिकिट बुक करण्याचा इरादा नव्हता. रात्री ११.३० च्या सुमाराला बर्च क्लब दुर्घटना घडली. त्यानंतर, संशयितांनी आपले मोबाईल बंद केले. दि. ७ रोजी पहाटे १.१३ च्या आसपास सौरभ लुथराने आपल्या पत्नीच्या मोबाईलवरुन एजंटशी संपर्क साधला आणि १.१७ वा. फुकेतसाठी (थायलंड) तिकीट बुक करण्यात आली. पहाटे ५.२० वा. ते फुकेतसाठी रवाना झाले. दुर्घटना घडली असतानाही संशयित अर्जदारांनी आपली नैतिक जबाबदारी झटकत देशातून पलायन केले. यातूनच त्यांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
बर्च दुर्घटनेत १८ ते ३१ वयोगटातील निष्पाप तरुणांचा जीव गेला. यातील अनेकजण घरातील एकमेव कमावणारी व्यक्ती होते. दुर्घटनेवेळी अरुंद वाटेतून बाहेर पडताना चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती, असा जबाब दुर्घटनेत बचावलेल्या लोढा दांपत्याने नोंदवला आहे. लुथरा बंधू बनावटगिरी करुन क्लब चालवत होते, असा दावाही सरकारी वकिलांनी केला.
दरम्यान, दिल्लीतील पीडित जोशी कुटुंबियांच्या हस्तक्षेप याचिकेवर अॅड. विष्णू जोशी यांनी दिल्लीमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तीवाद करत लुथरा बंधूंच्या जामिनाला विरोध केला. त्यानुसार बुधवार २८ जानेवारीपर्यंत ही सुनावणी न्यायालयाने तहकूब केली. बुधवारी अर्जदार लुथरांचे वकिल म्हणणे मांडतील.
क्लब आगीप्रकरणी लुथरांचा निष्काळजीपणा
बर्च क्लबवर लुथरांचे थेट नियंत्रण होते. त्यांनीच, आपल्या मर्जीनुसार क्लबचे आर्किटेक्ट तयार करून घेतले होते. यात बांबू आणि इतर ज्वलनशील वस्तूंचा प्रामुख्याने समावेश होता. लुथरांच्या कंपनीने, संबंधित फायर-शो करणार्या कंपनीसोबत इव्हेंटचा करार केला होता. तरीही तिथे कोणतीच अग्निरोधक व्यवस्था नव्हती. त्यामुळे अर्जदारांना आपल्या कृतीचे पुरेपूर ज्ञान होते, असा दावा करत हा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकारी वकील जेनिफर सांतामारीया यांनी केली.