परंपरेला छेद देत पत्नीने दिला पतीच्या पार्थिवाला चिताग्नी

कुठ्ठाळी येथील प्रभाकर साळगावकर यांचे निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th January, 11:50 pm
परंपरेला छेद देत पत्नीने दिला पतीच्या पार्थिवाला चिताग्नी

पणजी : मोक्षप्राप्तीसाठी पुत्रानेच मंत्राग्नी द्यावा, या प्रचलित परंपरेला छेद देत करंझाळे येथील ७३ वर्षीय प्रतीक्षा प्रभाकर साळगावकर यांनी सांतिनेज स्मशानभूमीत आपल्या पतीच्या पार्थिवाला चिताग्नी दिला.

मूळ कुठ्ठाळी येथील व सध्या करंझाळे येथे वास्तव्यास असलेले प्रभाकर साळगावकर (वय ८२) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार पत्नी प्रतीक्षा साळगावकर यांनी अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारून हे विधी पार पाडले.

साळगावकर दाम्पत्याला दोन विवाहित कन्या आहेत. मोठी कन्या रुपा विराज शिरगावकर या आर्किटेक्ट असून दुसरी कन्या डॉ. पिंकी सतीश पालयेकर या बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आहेत.

स्व. प्रभाकर साळगावकर हे एमपीटीचे माजी अधिकारी होते. तसेच एमपीटी कर्मचारी युनियन सहकारी क्रेडिट सोसायटीचे ते संस्थापक होते. सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

कुठ्ठाळी ग्रामस्थ सेवा संघ संस्थेतर्फे त्यांनी कुठ्ठाळी येथे श्रीदत्त मंदिर उभारण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या निधनाने सामाजिक व सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा