गोव्यातील ५०० जणांना २.९० कोटींचा गंडा; मुख्य सूत्रधाराला मुंबईत अटक

सीए शिवाजी वाळके याला १४ दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोव्यातील ५०० जणांना २.९० कोटींचा गंडा; मुख्य सूत्रधाराला मुंबईत अटक

पणजी : राज्यातील सुमारे ५०० जणांना २.९० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) मुख्य सूत्रधार आणि चार्टर्ड अकाऊंटंट शिवाजी वाळके या संचालकाच्या मुंबईत मुसक्या आवळल्या. वाळके याला मेरशी प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

सांतइस्तेव येथील वेनॉन डायस यांनी ईओसीत तक्रार दाखल केली. त्यानुसार, बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्याची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके या संशयितांनी म्हापसा येथे कार्यालय उघडले. संशयितांनी तक्रारदारासह गोव्यातील सुमारे ५०० जणांना जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून तोरसे - पेडणे येथील जमिनीत, कंपनीच्या निवृत्ती वेतन योजनेत, बायोकॉईन आणि इतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार संशयितांनी तक्रारदार व इतरांकडून २.९० कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदारांना भूखंड आणि इतर मोबदला न देता कार्यालय बंद करून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले. याची दखल घेऊन ईओसीचे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्याची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

याच दरम्यान मुख्य सूत्रधार आणि चार्टर्ड अकाउंटंट शिवाजी वाळके मुंबईत असल्याचे समोर आले. त्यानुसार, ईओसीचे अधीक्षक अर्शी अादिल आणि उपअधीक्षक फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी संशयित वाळके याला मुंबईत अटक करून गोव्यात आणले. संशयिताला मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

तिघे न्यायालयीन कोठडीत

ईओसीने २२ डिसेंबर २०२५ रोजी संशयित सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर या तिघांना अटक केली. त्यानंतर वरील तिघांना न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्या तिघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

हेही वाचा