तारवाडा कोलवाळ येथे क्षुल्लक कारणावरुन वाद

म्हापसा : तारवाडा, कोलवाळ येथे दारूच्या नशेत भाडेकरू खोली मित्र अमित श्रीकृष्ण कुमार (रा. उत्तरप्रदेश) याच्यावर क्षुल्लक वादातून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी संजय रामशंकर सहानी व ओमप्रकाश रामशंकर सहानी (रा. मूळ उत्तरप्रदेश) या दोघांना अटक केली आहे.
मारहाणीची घटना सोमवार दि. १९ रोजी दुपारी १.३० वा. सुमारास फिर्यादी अमित कुमार याच्या खोलीवर घडली होती. संशयित भाडेकरू सहकारी संजय सहानी व त्याचा सख्खा भाऊ ओमप्रकाश सहानी याच्यासोबत खोलीवर आला. फिर्यादी व संशयित आरोपी हे दारूच्या नशेत होते. तिथे त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला असता संशयितांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हे भांडण संशयित व फिर्यादीने आपापसात सामोपचाराने मिटवले.
बुधवार, २१ रोजी सकाळी फिर्यादी अमित कुमार हा बांधकामस्थळी कामावर गेला असता त्याच्या पोटात दुखू लागले. उपचारार्थ बांधकाम कंत्राटदाराने त्याला प्रथम कोलवाळ आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून डॉक्टरांनी म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले. त्याला अंतर्गत जखम झाल्यामुळे गोमेकॉत दाखल होईपर्यंत अमित कुमार याची तब्बेत अजून खालावली गेली.
याबाबतची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी गोमेकॉत जाऊन जखमी अमित कुमार याची तक्रार नोंदवून घेतली. गुरुवारी पहाटे भारतीय न्याय सं. कलम १०९(१), ३५२ व ३(५) कलमान्वये खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.
संशयित आरोपी ओमप्रकाश याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास कोलवाळ पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश घाडी हे करीत आहेत.
मंगळुरू पोलिसांच्या सहाय्याने संशयिताला अटक
मारहाण केलेल्या मित्रावर इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती मिळताच संशयित आरोपी संजय हा मंगळुरू येथे पसार झाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी मंगळुरू पोलिसांच्या सहाय्याने संशयिताला अटक केली. कोलवाळ पोलीस संशयिताला शुक्रवारी पहाटेपर्यंत गोव्यात आणणार आहेत.