बार्देशमध्ये दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार

म्हापसा पोलिसांकडून बापलेकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देशमध्ये दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार

म्हापसा : दोन सख्ख्या ८ व १० वर्षीय अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार बार्देश तालुक्यात घडला असून याप्रकरणी पीडित मुलींचे शेजारी असलेल्या संशयित बापलेकाला म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे.

या लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितांच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना मागील आठवड्यात घडली होती तर पीडित मुलींनी बुधवार २१ जानेवारी रोजी आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराला वाचा फोडली. त्यानंतर पोलिसांनी फिर्यादींची तक्रार नोंदवून घेतली. तसेच पीडित मुलींचा जबाब घेण्यात आला.

संशयित आरोपींनी हेतुपूरस्सर पीडित ८ व १० वर्षीय शाळकरी मुलींचा लैंगिक छळ केला. तसेच त्यांना बेकायदेशीरपणे आपल्या घरात डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६५(२), ७५(२), ७९, १२७(२), गोवा बाल कायदा कलम ८, ८(२), पॉक्सो कायदा कलम ४, ६, ८, १०, १२ आणि बाल न्याय काळजी व संरक्षण कायदा कलम ७५, ८४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याखाली पोलिसांनी संशयित आरोपी ६८ वर्षीय वडील व ३९ वर्षीय मुलाला अटक केली आहे.

दरम्यान, म्हापसा न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा