सोमवारी विशेष सभा : राज्याबाहेरील व्यक्तीला जागा देण्यास विरोध

फोंडा : उसगाव कोमुनिदादच्या सर्व्हे क्रमांक २१६/० आणि २१७/० या जागा मित्तल नावाच्या व्यक्तीला लीजवर देण्याचा निर्णय कोमुनिदाद समितीने विशेष आमसभेत घेतल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. स्थानिकांना डावलून राज्याबाहेरील व्यक्तीला ही जागा देण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी उसगाव येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे.
कोमुनिदाद समितीची आमसभा आदिनाथ सभागृहात आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर अंदाजे ४०-५० जणांनी सभागृहाच्या बाहेर ठाण मांडले. कोमुनिदाद समितीच्या पदाधिकाऱ्यांची सभा संपल्यानंतर ग्रामस्थांनी सभागृहात प्रवेश करून जाब विचारला. कोमुनिदाद स्थानिकाला डावलून बाहेरच्या लोकांना जमीन देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. आमसभेवेळी परिसरात खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मित्तल नावाच्या व्यक्तीला लीजवर जमीन देण्यासंबंधीचा समितीने निर्णय घेतल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली. यावेळी काही वेळ सभासद तसेच ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला. आमसभेत घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती देण्यापूर्वीच कोमुनिदाद समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तेथून निघून जाणे पसंत केले.
कोमुनिदाद समितीने काही जागा मित्तल नावाच्या व्यक्तीला यापूर्वीच दिली आहे. उर्वरित जागा देण्यासाठी रविवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जागा लीजवर देण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. मित्तल नावाचा व्यक्ती कॅसिनोचा मालक असून तीन महिन्यांपूर्वी गुरांच्या मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी कुळे पोलीस स्थानकात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. नवीन आदिनाथ मंदिर उभारून देण्याचे आश्वासन मित्तल यांनी कोमुनिदाद समितीला दिल्याने पदाधिकाऱ्यांनी जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक लोक नवीन मंदिर उभारण्यात सक्षम आहेत. त्याचबरोबर जागा सुद्धा खरेदी करण्यास स्थानिक लोक तयार असून स्वार्थासाठी काही पदाधिकारी जागा मित्तल यांना देत असल्याचे मनीषा उसगावकर यांनी सांगितले.
रोहन नाईक म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जागा मित्तल नावाच्या व्यक्तीच्या नावावर करण्यात काही नेत्यांचा समावेश आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी ग्रामस्थांच्या सह्या घेण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी सभेत पुढील कृती ठरविण्यात येणार आहे.
गरज पडल्यास न्यायालयात जाणार!
सत्यविजय नाईक यांनी स्थानिक लोक याविरुद्ध लढा देणार असून त्यानिमित्ताने सोमवारी संध्याकाळी खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लोकांची जागा गोव्याबाहेरील व्यक्तीला देण्यात स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. समितीचे पदाधिकारी पदाचा गैरवापर करीत असून गरज पडल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.