१.१२ लाख रुपये उकळले, दोघा युवतींसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद

म्हापसा : कळंगुट येथे एस्कॉर्ट सेवा देण्याच्या नावाखाली गुजरातमधील तीन पर्यटक युवकांना धमकावून १.१२ लाख रुपये उकळण्याचा प्रकार घडला. ऑनलाईन तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघा युवतींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ११ जानेवारी रोजी कळंगुट येथे घडली होती. पीडित युवकांनी घरी गेल्यावर शुक्रवार, २३ रोजी कळंगुट पोलिसांत ऑनलाईन तक्रार दाखल केली.
सुरज गुजरात येथील फिर्यादी यश शाह हे आपल्या मोक्ष हार्दिक व आगम विजयभाई या मित्रांसमवेत गोव्यात पर्यटनासाठी आले होते. घटनेच्या दिवशी ११ जानेवारी रोजी त्यांनी ऑनलाईन एस्कॉर्ट सर्विसेस संकेतस्थळावर संपर्क साधला. नंतर त्यांनी एका अज्ञात संशयित पुरूषाशी संपर्क साधला. संशयिताने तीन मुलींसाठी १५ हजार रुपयांचा सौदा निश्चित केला आणि मुलींचे फोटो त्यांना पाठवले. नंतर फक्त दोनच युवती आल्या, दाखवलेल्या फोटोमधील त्या मुली नव्हत्या. संशयित युवतींनी संगनमताने या पर्यटक युवकांच्या हॉटेलच्या खोलीमध्ये प्रवेश केला आणि तिथे गोंधळ घातला. अतिरिक्त पैसे न दिल्यास खोट्या गुह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयित युवतींनी तिन्ही युवकांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले आणि त्यांच्या बँक खात्यातून अनधिकृतपणे १ लाख १२ हजार २०० रुपये रक्कम जबरदस्तीने हस्तांतरित करून घेतली.
पीडित पर्यटक गावी गेल्यावर त्यांनी तिथून ऑनलाईन तक्रार पाठवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिन्ही अज्ञात संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४), ३०८(२) व ३(५) कलमान्वये लुबाडणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नाईक हे करीत आहेत.
खोट्या गुह्यांमध्ये अडकवण्याची धमकी
युवतींनी पर्यटक युवकांच्या हॉटेलच्या खोलीमध्ये प्रवेश करीत गोंधळ घातला. अतिरिक्त पैसे न दिल्यास खोट्या गुह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर युवतींनी तिन्ही युवकांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले आणि त्यांच्या बँक खात्यातून रक्कम हडप केली.