भारत पर्व उत्सव ३१ जानेवारीपर्यंत नवी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर राहणार जनतेसाठी खुला

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : भारताच्या सांस्कृतिक, कलात्मक, पाककृती आणि आध्यात्मिक वारशाचा प्रमुख वार्षिक कार्यक्रम असलेल्या ‘भारत पर्व २०२६’मध्ये ‘स्वतंत्रता का मंत्र - वंदे मातरम्’ या संकल्पनेवर गोव्याचा चित्ररथ सादर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने ‘भारत पर्व’चे आयोजन केले होते. भारत पर्व उत्सव ३१ जानेवारीपर्यंत नवी दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर जनतेसाठी खुला राहील.
संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात २०२४-२०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी राज्य, संघप्रदेशांचे चित्ररथ निवड करण्याची प्रक्रिया आणि नियमांच्या सामंजस्य करारानुसार यावर्षी ‘भारत पर्व’ येथे हा चित्ररथ सादर केला. विविधतेत एकता या भारताच्या भावनेचा उत्सव साजरा करण्यासाठी भारत पर्व उत्सावाचे आयोजन केले आहे. फोंडा येथील प्रसिद्ध कलाकार सुशांत खेडेकर यांनी तयार केलेला चित्ररथ भारत पर्व उत्सवात प्रदर्शित केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय निवड समितीने हा चित्ररथ निवडला. गोवा मुक्ती चळवळ, सत्याग्रहींचे योगदान, ऐतिहासिक आग्वाद तुरूंगवासाची प्रतिमा, अशोक स्तंभ, भारतमातेची प्रतिमा आणि गोवा मुक्ती चळवळीत महत्त्वाची भूमिका असलेले डॉ. राम मनोहर लोहिया यांची प्रतिमा चित्ररथाद्वारे प्रदर्शित केली. त्याचप्रमाणे घोडेमोडणी, पारंपरिक लोकनृत्य आणि इतर वारश्याचे दर्शन घडते.
गोव्याचा चित्ररथ तयार करण्याचे काम नवी दिल्लीत राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात सुशांत खेडेकर यांच्या देखरेखीखाली कलाकारांनी केले. चित्ररथास डॉ. साईश देशपांडे यांचे संगीत लाभले. वेशभूषा संगीता खेडेकर तर लोकनृत्याची जबाबदारी दिनेश प्रियोळकर यांनी सांभाळली. चित्ररथाव्यतिरिक्त, राज्याने पर्यटन खात्याच्या अंतर्गत गोव्याच्या पाककृतींचे प्रदर्शन करणारा खाद्यपदार्थ स्टॉलही उभारला आहे. माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे भारत पर्व उत्सवात गोव्याचा चित्ररथ प्रदर्शित केला.