कनिष्ठांना वाकुल्या, वरिष्ठांना लागोपाठ बढत्या!

२५ वर्षांपासून एकाच पदावर : नियमात शिथिलता दिल्याने असंतोष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd January, 10:58 pm
कनिष्ठांना वाकुल्या,  वरिष्ठांना लागोपाठ बढत्या!

पणजी : एकीकडे पोलीस खात्यातील कनिष्ठ कर्मचारी मागील २५ वर्षांपासून एकाच पदावर काम करत असताना, दुसरीकडे वरिष्ठ पातळीवर मात्र वेगाने बढत्यांचे सत्र सुरू आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (दि. २३) एका महत्त्वाच्या आदेशाद्वारे पोलीस खात्यातील १९ उपअधीक्षकांना (DySP) पोलीस अधीक्षकपदी (SP) बढती दिली आहे. सेवा कालावधीच्या अटी शिथिल करून ही बढती देण्यात आल्याने कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

१९ अधिकाऱ्यांना अधीक्षकपदी बढती

कार्मिक खात्याचे अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला. गोवा लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार १९९१ च्या बॅचमधील ६ आणि १९९७ च्या बॅचमधील १३ अशा एकूण १९ अधिकाऱ्यांना ही पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये सलीम शेख, जीवबा दळवी, सिद्धांत शिरोडकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बढती प्रक्रिया : वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ कर्मचारी

घटक सद्यस्थिती
वरिष्ट अधिकारी (DySP to SP) सेवा अटी शिथिल करून अवघ्या २ वर्षांत नवी बढती.
कनिष्ठ कर्मचारी (Constable) सुमारे २५० कर्मचारी गेल्या २५ वर्षांपासून एकाच पदावर.
नियम शिथिलता ६ वर्षांच्या सेवा काळाची अट ऑगस्ट २०२५ मध्ये रद्द.
कर्मचारी आक्षेप नियम केवळ वरिष्ठांसाठीच का? उच्च न्यायालयात धाव.

नियमांत मोठी शिथिलता आणि असंतोष

पोलीस अधीक्षकपदावर बढतीसाठी किमान सहा वर्षांचा सेवा काळ आणि खात्यांतर्गत परीक्षांची अट असते. मात्र, या अटी ऑगस्ट २०२५ मध्ये शिथिल करण्यात आल्या. या अधिकाऱ्यांना २०२४ मध्ये नियमित करण्यात आले होते आणि आता अवघ्या दोन वर्षांत त्यांना पुन्हा बढती देण्यात आली आहे. याउलट, २५ वर्षांपासून सेवेत असलेले सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल मात्र प्रगतीपासून वंचित आहेत.

नाराज कर्मचारी न्यायालयाच्या उंबरठ्यावर

इतर सरकारी खात्यांत २५ वर्षांत किमान तीन बढत्या मिळतात, मात्र पोलीस दलात ही संधी नाकारली जात असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सरकार आणि पोलीस महासंचालकांकडून तोडगा निघत नसल्याने नाराज कर्मचाऱ्यांनी आता गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच कॉन्स्टेबलनाही सेवेचा कालावधी शिथिल करून न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

#GoaPolicePromotion #PoliceConstableIssue #HighCourtGoa #PramodSawant #GoaNews