दिल्लीत बैठक : आक्रमक नेतृत्वासाठी फेरबदलाची शक्यता

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, प्रदेशाध्यक्षपदासह महत्त्वाच्या पदांवर नवीन चेहरा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गिरीश चोडणकर, गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि विधिमंडळ पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन पक्षकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. पक्षाला आक्रमक नेतृत्वाची गरज असून त्यासाठी येत्या काळात मोठे संघटनात्मक बदल केले जातील. केंद्र व राज्यातील भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात विशेष मोहीम राबवली जाईल, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीस आता एक वर्ष शिल्लक असून पक्ष सत्तेत येण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे. युतीबाबत चर्चा झाली असून, ज्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत मित्र पक्षांना दिल्या जाणार नाहीत. मात्र, जिथे काँग्रेसची ताकद मर्यादित आहे, तिथे तडजोड करून समविचारी पक्षांशी युतीचा पर्याय खुला ठेवण्यात येईल.
"या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका, संघटनात्मक कामकाज आणि राज्यातील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य सरकारमधील भ्रष्टाचार उघडकीस आणून त्याबाबत जनतेमध्ये जागृती केली जाईल."
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
"भाजप सरकारचा भ्रष्टाचार उघड्यावर आणून त्याबद्दल जागृती केली जाईल. युतीचा पर्याय खुला असला तरी पक्ष मजबूत असलेला मतदारसंघ मित्रपक्षांना मिळणार नाही."
- अमित पाटकर, गोवा प्रदेशाध्यक्ष