कथित मृत महिला सापडल्या जिवंत : तपासात धक्कादायक माहिती

म्हापसा : उत्तर गोव्यातील हरमल तसेच मोरजी या भागात दोन रशियन महिलांचा निर्घृण खून केल्याप्रकरणी अटकेत असलेला रशियन संशयित अलेक्सी लिओनोव (३७) याचे दावे खोटे ठरत आहेत. त्याने १५ पेक्षा जास्त महिलांना ‘मोक्ष’ दिल्याची (खून केल्याची) कबुली दिली होती. मात्र, गोवा, हिमाचल प्रदेश तसेच दिल्ली पोलिसांनी केलेल्या पडताळणीत यातील अनेक महिला जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संशयिताने दिलेल्या नावांची पडताळणी करण्यासाठी गोवा पोलिसांनी दिल्ली आणि हिमाचल प्रदेश पोलिसांना सतर्क केले होते. मयत मृदुस्मिता सायकीया वगळता, संशयिताने सांगितलेल्या नावांच्या बहुतांश महिला सुखरूप असल्याचे आढळून आले आहे. संशयित हा घटनेच्या दिवशी मादक पदार्थाच्या अंमलाखाली असल्याने त्याने ही कथा रचली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
| नाव / दावा | तपासातील निष्कर्ष |
|---|---|
| एलिना वानिवा (रशिया) | खून झाला; गळा चिरल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट. |
| एलिना कास्तानोव्हा (रशिया) | हरमल येथे गळा चिरून खून करण्यात आला. |
| मृदुस्मिता सायकीया (आसाम) | मृत्यू झाला; मात्र मादक पदार्थाच्या अतिसेवनाचा प्राथमिक अंदाज. |
| इतर १५ महिला (दावा) | पडताळणीत बहुतांश महिला जिवंत असल्याचे निष्पन्न. |
मोरजी-मधलोवाडा येथे खून झालेल्या एलिना वानिवा हिच्या मृतदेहावर रशियन दूतावासाच्या मान्यतेनंतर गोमेकॉमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. धारदार शस्त्राने गळा चिरल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे, आसामच्या मृदुस्मिता सायकीया हिचा मृत्यू संशयास्पद असून तिचा व्हिसेरा अधिक तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
अटकेनंतर अलेक्सी लिओनोव पोलिसांची दिशाभूल करत आहे. तो अनावश्यक गोष्टींवर भरभरून बोलतो, मात्र खुनाचे नेमके कारण विचारले असता मौन बाळगतो. मांद्रे पोलीस सध्या विविध पद्धतीने त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जोपर्यंत यादीतील सर्व महिलांचा शोध लागत नाही, तोपर्यंत पोलीस कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाहीत.