गोमेकॉतील ओपीडीसाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन अपॉईमेंट बुकिंग

आरोग्यमंत्री : मेडिसिन, सर्जरी, त्वचा, ईएनटी, अस्थिरोग विभागांच्या ओपीडींचा समावेश


53 mins ago
गोमेकॉतील ओपीडीसाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन अपॉईमेंट बुकिंग

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) पाच ओपीडींसाठी ऑनलाईन अपॉईमेंट बुकिंग करावे लागणार आहे. यामध्ये मेडिसिन, सर्जरी, त्वचा, ईएनटी आणि अस्थिरोग विभागांच्या ओपीडींचा समावेश आहे. ही सेवा पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे येथील रांगा तसेच प्रतीक्षा वेळ कमी होणार आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या रुग्णालयाच्या भेटीचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यास मदत होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
ऑनलाईन अपॉईमेंट बुकिंगसाठी गोमेकॉच्या ऑनलाईन अपॉइंटमेंट पोर्टलवर मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी दिल्यावर रुग्णांचे प्रोफाईल ओपन होईल. याआधी रुग्णाची नोंद केली नसल्यास नवीन नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना डीडीएसएसवाय किंवा आभा क्रमांकाची माहिती भरावी लागेल. यानंतर रुग्णाविषयी अन्य माहिती द्यावी लागेल. आवश्यक सर्व माहिती भरल्यावर १०० रुपये नोंदणी शुल्क यूपीआय अथवा अन्य ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
हे नोंदणी शुल्क २ वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. पेमेंट यशस्वी झाल्यावर एमआर क्रमांक दिला जाईल. यानंतर रुग्णाचे प्रोफाईल निवडून त्याला आवश्यक असणारा विभाग निवडावा लागेल. तारीख आणि वेळ निवडून अपॉईमेंट बुक करता येईल. वेळेआधी ३० मिनिटे उपस्थित राहणे आवश्यक आहे. अपॉईमेंट बुक झाल्यावर एमआर क्रमांक आणि टोकन क्रमांक डाऊनलोड करून तो गोमेकॉतील ओपीडीमध्ये दाखवावा लागेल.

आरोग्य सेवेसाठीच्या गोवा मॉडेलला अधिक बळकट करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे. आरोग्यप्रणाली सुलभ करून आम्ही लोकांना सन्मानाने, सहजतेने आणि अधिक वेगाने आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रणालीची सुरळीत अंमलबजावणी व्हावी आणि नागरिकांना प्रत्यक्ष त्याचे फायदे मिळावेत यासाठी आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव प्रणब भट यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
_ विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

हेही वाचा