विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी करणार युती

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बदल होणार आहेत. गट, जिल्हा समितीमधील बदल प्रदेश समिती करेल. प्रदेश स्तरावरील बदलांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे काँग्रेस विधीमंडळ गटाचे नेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
काँग्रेसची मंगळवारी दिल्लीत बैठक झाली. गोव्याच्या स्थितीवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि युरी आलेमाव उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
बैठकीत राज्याची राजकीय स्थिती आणि संघटनेच्या स्थितीवर चर्चा झाली. राज्यात आता कुशावती या तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आता कुशावती जिल्ह्यासाठी समिती स्थापन केली जाईल. याशिवाय इतरही बदल होणार आहेत. राज्य पातळवरील बदलाचा निर्णय स्थानिक नेते घेऊ शकत नाहीत. विधीमंडळ नेते पदावरून मला मुक्त करायचे असेल तर तो निर्णयही केंद्रीय नेतेच घेणार आहेत, असेही युरी यांनी स्पष्ट केले.
आवश्यकता भासल्यास उत्पल पर्रीकरांचाही पाठिंबा घेणार
२०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांसोबत युती केली जाईल. विरोधी पक्षांची युती झाली तर भाजपला हरवणे सोपे होणार आहे. काँग्रेस पक्ष पणजी महापालिका निवडणूक लढवणार आहे. भाजपला हरवण्यासाठी एखादी व्यक्ती वा पक्षाचा पाठिंबा घेण्याची आमची तयारी आहे. आवश्यकता भासल्यास उत्पल पर्रीकर यांचाही पाठिंबा घेण्याची आमची तयारी आहे, असेही युरी आलेमाव यांनी स्पष्ट केले.