इशान किशनचे शतक, अर्शदीप सिंगचे ५ बळी

तिरुवनंतपुरम : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या व अंतिम टी–२० सामन्यात ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका ४–१ अशी आपल्या नावे केली. टी–२० विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने या सामन्यात सर्व विभागांत प्रभावी कामगिरी करत आपली ताकद दाखवून दिली. इशान किशनचे शतक आणि अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले.
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरुवात आशादायक झाली; मात्र संजू सॅमसन ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा १६ चेंडूत ३० धावा करून माघारी परतला. पुढे इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूत १३७ धावांची जबरदस्त भागीदारी रचत डावाला वेग दिला.
इशान किशनने ४३ चेंडूत १०३ धावा करताना ६ चौकार आणि १० षटकार लगावले. सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावा केल्या; त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकार होते. या जोडीमुळे भारताने भक्कम पाया रचला. शेवटी हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावा (१ चौकार, ४ षटकार) करत डावाला भरारी दिली, तर रिंकू सिंग आणि शिवम यांनीही महत्त्वाचे फटके खेळले. भारताने निर्धारित २० षटकांत २७१ धावा उभारल्या.
न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने २ विकेट्स, तर डफी, जेमिसन आणि सँटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
अर्शदीपची घातक गोलंदाजी
२७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची फलंदाजी दबावाखाली कोलमडली. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने धारदार मारा करत ५ विकेट्स घेतल्या. त्याला इतर गोलंदाजांचीही उत्तम साथ मिळाली आणि न्यूझीलंडचा डाव २२५ धावांत आटोपला. परिणामी भारताने सामना ४६ धावांनी जिंकला.
मालिकेतील पहिल्या तीन सामने भारताने एकतर्फी जिंकले होते; चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. मात्र निर्णायक पाचव्या सामन्यात भारताने सर्व बाजूंनी वर्चस्व राखत मालिका ४–१ ने जिंकली. फलंदाजीतील आक्रमकता, गोलंदाजांची शिस्त आणि क्षेत्ररक्षणातील चपळता या तिन्ही गोष्टींनी भारताचा हा विजय अधिक ठळक ठरला.
सूर्यकुमार यादवचा वर्ल्ड रेकॉर्ड
या सामन्यातील अर्धशतकासह सूर्यकुमार यादवने टी–२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या आणि तोही केवळ १,८२२ चेंडूत—हा जागतिक विक्रम आहे. यापूर्वी हा टप्पा इतक्या कमी चेंडूत कोणीही गाठला नव्हता. या यादीत पुढे मुहम्मद वसीम (१,९४७ चेंडू), जोस बटलर (२,०६८), आरोन फिंच (२,०७७) आणि डेव्हिड वॉर्नर (२,११३) यांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंमध्ये याआधी रोहित शर्मा (२,१४९) आणि विराट कोहली (२,१६९) यांनी ३,००० धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात जलद ३००० टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारे फलंदाज
१८२२ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत)
१९४७ चेंडू – मुहम्मद वसीम (यूएई)
२०६८ चेंडू – जोस बटलर (इंग्लंड)
२०७७ चेंडू – आरोन फिंच (ऑस्ट्रेलिया)
२११३ चेंडू – डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
सर्वाधिक धावा देत घेतलेले ५ बळी
५/५१ – अर्शदीप सिंग विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम (२०२६)
५/४० – अल्झारी जोसेफ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग (२०२३)
५/३९ – लुंगी एनगिडी विरुद्ध इंग्लंड, ब्रिस्टल (२०२२)
टी-२० सामन्यातील सर्वाधिक षटकार
• ४१ षटकार – बल्गेरिया विरुद्ध जिब्राल्टर, सोफिया (२०२५)
• ३६ षटकार – भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम (२०२६)*
• ३५ षटकार – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट्युरियन (२०२३)
• ३४ षटकार – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, सेंट जॉर्जेस (२०२३)बॉक्स
टी-२० सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा
• ५१७ धावा – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट्युरियन (२०२३)
• ४९६ धावा – भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम (२०२६)
• ४८९ धावा – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, लॉडरहिल (२०१६)