चोरीचा प्रयत्न हाणून पाडला; वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत

पणजी : दृष्टी मरीनच्या प्रशिक्षित जीवरक्षकांनी आठवड्याच्या सुट्टीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी करत चारजणांना बुडण्यापासून वाचवले. याच कालावधीत त्यांनी चोरीचा एक प्रयत्न हाणून पाडला, दोन हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरुप पोहोचवले, तसेच कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या स्टिंगरे माशाच्या हल्ल्यासह चार वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्या.
राजस्थानमधील तीन वर्षांची एक मुलगी हरमल समुद्रकिनाऱ्यावर एकटीच फिरताना आढळली. दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी तिला सुरक्षित ताब्यात घेतले आणि तिच्या पालकांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबवली. योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अाश्वे समुद्रकिनाऱ्यावर उत्तर प्रदेशातील २४ वर्षीय तरुणाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. पाच जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेत प्रथमोपचार करून त्याची प्रकृती स्थिर केली व अधिकृत वाहनातून त्याला शिवाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
मोरजी किनाऱ्यावर नोएडा येथील ३८ वर्षीय महिला समुद्रात पोहत असताना अडचणीत आली. जीवरक्षक अमोन साळगावकर, प्रथमेश कुबल आणि सचिन नाईक यांनी बचाव बोट, रेस्क्यू ट्यूब व जेटस्कीच्या सहाय्याने तिला सुरक्षित किनाऱ्यावर आणले. दुसऱ्या घटनेत, ५० वर्षीय रशियन महिलेला पाण्यात अडचणीत सापडलेली पाहून जीवरक्षक दत्ताराम चव्हाण यांनी तत्काळ बचावकार्य करत तिला किनाऱ्यावर आणले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
हणजुण समुद्रकिनाऱ्यावर उत्तर प्रदेशातील एका पुरुष पर्यटकाला खडकाळ भागात चालताना गंभीर जखम झाली व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. जीवरक्षक सूरज निंबाळकर यांनी तत्काळ प्रथमोपचार करून रक्तस्त्राव थांबवला व त्याला त्याच्या मित्रांच्या स्वाधीन केले.
बागा समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्रातील चार वर्षांची एक मुलगी समुद्रकिनाऱ्यावर एकटी आढळली. जीवरक्षकांनी तत्परतेने तिच्या पालकांचा शोध घेऊन तिला त्यांच्या स्वाधीन केले.
याच ठिकाणी हिमाचल प्रदेशातील २४ वर्षीय पर्यटकाचा हरवलेला मोबाईल फोन बीच मार्शल रिया यांच्या मदतीने शोधून पडताळणीनंतर परत करण्यात आला.
कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर कर्नाटकातील ४० वर्षीय पर्यटकाला समुद्रात पोहत असताना स्टिंगरे माशाने दंश केला. जीवरक्षक अश्विन घाग आणि संदेश म्हाळकर यांनी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारांसाठी कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले.
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर कर्नाटकातील ५४ वर्षीय पर्यटक बुडताना आढळल्यावर जीवरक्षक शुभम मुखियाने बचाव बोटीच्या सहाय्याने त्याला सुरक्षित बाहेर काढले.
कोलवा समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक सचिन सुकाटे यांनी गर्दीतून बॅग चोरणाऱ्या संशयिताचा पाठलाग करून बीच मार्शलच्या मदतीने त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात केले.
केळशी समुद्रकिनाऱ्यावर ७० वर्षीय व्यक्ती असामान्य वागत असल्याची माहिती मिळताच जीवरक्षक रुपेश वेळीप, लवू गावकर आणि लक्ष्मण गावकर यांनी त्याला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवून रुग्णवाहिका येईपर्यंत प्रथमोपचार केले.
दूधसागर धबधब्याजवळ ट्रेकिंग करताना २२ वर्षीय तरुण कोणतीही सुरक्षा साधने नसताना पाण्यात अडकला. जीवरक्षक बाबू गवळी यांनी रेस्क्यू ट्यूबच्या सहाय्याने त्याला सुरक्षित बाहेर काढले.