कायद्यात बदल केल्यानंतरही राज्यात नावांमध्ये बदल करण्याचे प्रकार सुरूच

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
कायद्यात बदल केल्यानंतरही राज्यात नावांमध्ये बदल करण्याचे प्रकार सुरूच

पणजी : गोव्यात (Goa)  नाव तसेच आडनावात (Surname) बदल करण्यास मान्यता देण्याचे अधिकार नोंदणी रजिस्ट्रारकडून कनिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीशांना दिल्यानंतरही नावे वा आडनावे बदलण्याचे प्रकार सुरूच आहेत. कायद्यात बदल केल्यानंतरही नावे तसेच आडनावे बदलण्याचे प्रमाण पूर्वी सारखेच आहे. महिन्याकाठी नावे बदलण्यासाठी ८ ते १० अर्ज येतात, अशी माहिती नोंदणी (सीवील रजिस्ट्रार)  (Civil Registrar) कार्यालयातून मिळाली. होंडा - सत्तरी (Sattari) येथील सय्यद साहील या इसमाने आपले नाव साहील मांद्रेकर असे बदलण्यासाठी डिचोली कनिष्ठ श्रेणी न्यायालयात (Court) अर्ज केला आहे. प्रतिज्ञापत्र तसेच आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करण्यात आल्याने कनिष्ठ श्रेणी दिवाणी न्यायाधीशांनी हरकतींसाठी नोटीसही जारी केली आहे. अर्जदाराने १३ जानेवारी २०२६ रोजी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने २३ जानेवारी २०२६ रोजी हरकती सादर करण्यासाठी नोटीस दिली आहे. अर्जदाराचे नाव बदलण्यास कोणाची हरकत असल्यास त्यानी ती ३० दिवसांत म्हणजे २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करावी लागणार आहे. कोणाचीही हरकत नसल्यास कायद्याप्रमाणे त्याचे नाव बदलले जाणार आहे.

बरेच बिगरगोमंतकीय बरीच वर्षे गोव्यात राहिल्यानंतर नाव बदलण्यासाठी खटपट करतात. आडनावात बदल करून त्यांचे वास्तव्य असलेल्या गावाचे नाव आडनावात बदलण्याकडे त्यांचा कल असतो. विधानसभेतही यावर चर्चा झालेली आहे. यातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी २०२२ साली सरकारने कायद्यात दुरूस्ती केली. नाव वा आडनावात दुरूस्ती वा बदल करण्यास मान्यता देण्याचे अधिकार नोंदणी रजिस्ट्रारना न देता ते कनिष्ठ श्रेणी न्यायाधीशांना देण्यात आले. कनिष्ठ श्रेणी न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर नोंदणी खात्यात नाव बदलासाठीचे सोपस्कार केले जातात. कायद्यात बदल केल्यानंतरही नाव वा आडनावात बदल करण्याचे राज्यातील प्रमाण कमी झालेले नाही.




हेही वाचा