
वास्को : गोव्यातील (Goa) वेर्णा पोलीस हद्दीतील बिट्स पिलानीत (Bits Pilani) आता विद्यार्थीनीच्या आत्महत्येची (Suicide) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (ECE) शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. वसतिगृहातील खोलीतच ही आत्महत्येची घटना घडल्याने कॅम्पस परिसरात खळबळ माजली आहे.
मृत विद्यार्थिनी मूळची हरलूर, बेंगळुरू (Bangaluru), कर्नाटक (Karnataka) येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. वेर्णा पोलिसांनी (Verna Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री उशिरा पोलिसांना फोन आल्यानंतर उघडकीस आली. बिट्स पिलानीचे जनसंपर्क अधिकारी (PRO) अर्जुन हलांकर यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलण्यामागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, याआधी १६ ऑगस्ट २०२५ रोजी अर्थशास्त्र आणि संगणक विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा चार बाटल्या एनर्जी ड्रिंक पिल्यानं गूढरित्या मृत्यू झाला होता. तो मूळचा उत्तर प्रदेशहून शिक्षणासाठी आला होता. रात्री टेबलटेनिस खेळल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यानं चार बाटल्या एनर्जी ड्रिक्स पिलं होतं. पण, सकाळी ११ वाजेपर्यंत त्याची खोली बंद असल्याचं लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा कुशाग्र मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं. दरम्यान, शवविच्छेदनाच्या प्राथमिक तापसणीत एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळं त्याच्या मेंदू आणि फुफ्फुसाला इजा झाल्याचं आढळून आलंय.
त्याआधी १ मे २०२५ रोजी उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरातून शिक्षणासाठी आलेल्या कृष्णा कासेरा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
त्यापूर्वी ५ मार्च २०२५ रोजी गोव्यातल्या अथर्व देसाई या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. तर, ११ डिसेंबर २०२४ रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरातून आलेल्या ओम प्रियांश सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. हे सगळे मृत्यू वेर्णा पोलिसांनी आत्महत्या म्हणून नमूद केले आहेत.