
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात भीषण हिंसाचार उसळला असून; बॉम्बस्फोट आणि रॉकेट हल्ल्यांनी अनेक शहरे हादरली आहेत. बलुचिस्तानातील (Balochistan) दहा जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हल्ले झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने जोरदार प्रतिहल्ला चढवला. या संघर्षात तब्बल ४० तास गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये ३१ नागरीक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि १४५ बलुच लिबरेशन आर्मीचे (बीएलए) (Balochistan Liberation Army (BLA)) लढवय्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हिंसाचारामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलुच दहशतवादी गटांनी क्वेटा, ग्वादर, मुस्तुंग, नोशकीसह अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हल्ले केले. या हल्ल्यांची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली असून; त्यानंतर लष्कर, पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकांनी मोठी कारवाई सुरू केली.
पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारीच १०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेटा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या छापे व कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या मृत्यूंचाही या आकड्यात समावेश आहे. दहशतवादविरोधी कारवाईत पाकिस्तानने आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बीएलएने शनिवारी ‘ऑपरेशन हारोफ’चा दुसरा टप्पा सुरू केल्याची घोषणा केली. सुरक्षा दलांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. गटाचे प्रवक्ते जियांद बलोच यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या निवेदनात, नोशकी येथील काउंटर टेररिझम डिपार्टमेंट (सीटीडी)चे मुख्यालय ताब्यात घेण्यात आल्याचा तसेच फ्रंटियर कॉर्प्स युनिट उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, बंडखोरांनी जिल्हा तुरुंगातून किमान ३० कैद्यांची सुटका करून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याचेही सांगण्यात आले आहे.
हिंसाचारानंतर सुरक्षा दलांनी प्रभावित भागात शोध मोहीम तीव्र केली आहे. जवळपास डझनभर ठिकाणे सील करण्यात आली असून संपूर्ण प्रांतात २४ तासांहून अधिक काळ मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून रेल्वे सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. मुख्य रस्ते आणि बाजारपेठा बंद असल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात घरातच राहण्यास भाग पडले आहेत.
भारतावर आरोप, भारताकडून फेटाळणी
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने कोणताही ठोस पुरावा न देता या हल्ल्यांमागे भारताचा हात असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही हल्लेखोरांचे भारताशी संबंध असल्याचा दावा केला आहे.
मात्र, भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कडक निवेदन जारी करत म्हटले आहे की, असे आरोप पाकिस्तानच्या अंतर्गत अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी नेहमीच केले जातात. प्रत्येक हिंसक घटनेनंतर निराधार आरोप करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांकडे लक्ष द्यावे, असे भारताने स्पष्ट केले आहे.