सहा राज्यांत बौद्ध सर्किटच्या विकासासाठी योजना प्रस्तावित

नवी दिल्ली : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताला वैद्यकीय पर्यटन सेवांचे केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, खासगी क्षेत्राच्या भागीदारीत पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे स्थापन करण्यासाठी राज्यांना सहाय्य करणारी योजना सुरू करण्याचा मी प्रस्ताव मांडत आहे.
सीतारामन यांनी सांगितले की, ही केंद्रे वैद्यकीय, शैक्षणिक आणि संशोधन सुविधा एकत्रित करणारी एकात्मिक आरोग्य संकुले म्हणून कार्य करतील. या केंद्रांमध्ये आयुष केंद्रे, मेडिकल व्हॅल्यू टुरिझम सुविधा केंद्रे तसेच निदान, उपचारानंतरची काळजी आणि पुनर्वसनासाठी पायाभूत सुविधा असतील. ही केंद्रे डॉक्टर आणि सहयोगी आरोग्य व्यावसायिक (एएचपी) यांसह आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी विविध रोजगार संधी निर्माण करतील.
अर्थमंत्री म्हणाल्या, पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मिती, परकीय चलन मिळवणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यामध्ये मोठी भूमिका बजावू शकते. त्या पुढे म्हणाल्या, मी विद्यमान राष्ट्रीय परिषद-हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग तंत्रज्ञान यांचे उन्नयन करून एक राष्ट्रीय आदरातिथ्य संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडत आहे. ही संस्था शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून कार्य करेल. भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने, हायब्रिड पद्धतीने, २० प्रतिष्ठित पर्यटन स्थळांवरील १० हजार मार्गदर्शकांचे कौशल्यवर्धन करण्यासाठी प्रमाणित आणि उच्च दर्जाच्या १२ आठवड्यांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाची पायलट योजना प्रस्तावित केली.
भारताकडे जागतिक दर्जाचे ट्रेकिंग आणि हायकिंग अनुभव देण्याची क्षमता आणि संधी आहे. आम्ही पर्यावरणदृष्ट्या शाश्वत (i) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर येथे पर्वतीय ट्रेल्स; पूर्व घाटातील अराकू खोरे आणि पश्चिम घाटातील पोडिगई मलई, (ii) ओडिशा, कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागातील प्रमुख कासव अंडी घालण्याच्या ठिकाणांवर टर्टल ट्रेल्स, (iii) आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतील पुलिकट सरोवराच्या परिसरात पक्षी निरीक्षण ट्रेल्स विकसित करू.
पहिली जागतिक बिग कॅट शिखर परिषद
पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स स्थापन केला. या वर्षी भारत पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदचे आयोजन करत आहे, जिथे ९५ क्षेत्रीय देशांतील सरकारप्रमुख आणि मंत्री संवर्धनासाठी सामूहिक धोरणांवर चर्चा करतील.
ईशान्य भारतावर लक्ष
ईशान्येतील अरुणाचल, सिक्कीम, आसाम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या सहा राज्यांमध्ये ‘बौद्ध सर्किट’ विकसित केले जाणार आहे. यामध्ये प्राचीन मठ, मंदिरे यांचे जतन आणि यात्रेकरूंसाठी आधुनिक सुविधांवर भर दिला जाईल. तसेच ५ पूर्वोदय राज्यांमध्ये ५ नवीन पर्यटन स्थळे आणि ४ हजार ई-बसची तरतूद केली आहे.