कर्करोगाच्या १७ औषधांवरील प्राथमिक सीमाशुल्क माफ

वैयक्तिक आयातीवरील शुल्क १० टक्क्यांनी घटले

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
13 hours ago
कर्करोगाच्या १७ औषधांवरील प्राथमिक सीमाशुल्क माफ

नवी दिल्‍ली : केंद्रीय अर्थसंकल्पात रुग्णांच्या कल्याणासाठी औषधांवरील करात सवलती देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. रुग्णांना, विशेषतः कर्करोगग्रस्तांच्या उपचारांचा खर्च कमी करण्यासाठी १७ महत्त्वाच्या औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. यामुळे ही महागडी औषधे आता स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.
आणखी सात दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी लागणारी औषधे आणि ‘फूड फॉर स्पेशल मेडिकल पर्पजेस’ यांच्या वैयक्तिक आयातीवरही शुल्क माफ करण्यात आले आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व करपात्र वस्तूंवरील आयात शुल्क दर २० टक्क्यांवरून थेट १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.
आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाच्या क्लिअरन्स प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. सीमाशुल्क मुक्त सवलतींच्या मर्यादेत वाढ करण्यात येणार आहे. देशात वस्तू आणताना किंवा बाहेर नेताना होणारी कागदपत्रांची प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि सोपी केली जाईल. यामुळे प्रामाणिक करदाते वेळेत शुल्क भरून कायदेशीर कारवाई टाळू शकतील.
सीमाशुल्क प्रक्रियेत सुलभता
व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी सीमाशुल्क प्रक्रियांची संख्या कमी करून त्यात सुलभता व निश्चितता आणली जाईल. तसेच मालाची ने आण अधिक सुरळीतपणे पार पाडावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
‘एईओ‍’साठी विशेष सवलती
टियर २ आणि टियर ३ च्या अधिकृत आर्थिक ऑपरेटर्ससाठी (एईओ) ड्युटी डिफरल कालावधी १५ दिवसांवरून वाढवून ३० दिवस करण्याचा प्रस्ताव आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ऍडव्हान्स रुलिंगचा वैध कार्यकाळ ३ वर्षांवरून ५ वर्षांपर्यंत वाढवला जाईल, ज्यामुळे व्यापारात अधिक निश्चितता येईल.       

हेही वाचा