शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियो​जन

मत्स्य व्यवसाय मूल्य साखळी बळकट करण्यासाठी उपाययोजना

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
14 hours ago
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियो​जन

नवी दिल्‍ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा केली आहे. ५०० जलसाठे आणि अमृत सरोवरांच्या सर्वांगीण विकासासह, मत्स्य व्यवसाय, पशुधन आणि उच्च मूल्य असलेल्या पिकांच्या उत्पादनासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
अर्थमंत्र्यांनी उच्च मूल्य कृषीच्या संवर्धनासाठी किनारी भागांमध्ये नारळ, चंदन, कोको आणि काजू यांसारख्या उच्च मूल्य पिकांचे उत्पादन व मूल्यवर्धन यासाठी पाठबळ देण्यावर भर दिला. यासोबतच ईशान्य भारतातील अगर वृक्षांची लागवड, तसेच डोंगराळ प्रदेशांमध्ये बदाम, अक्रोड आणि पाईन नट्स यांसारख्या सुकामेव्याच्या पिकांच्या विकासालाही प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये भारतीय काजू आणि कोकोसाठी स्वतंत्र कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. जुनी व कमी उत्पादन देणारी बागायत पुनरुज्जीवित करण्यासाठी, तसेच अक्रोड, बदाम आणि पाईन नट्स यांच्या उच्च घनता लागवडीचा विस्तार करण्यासाठी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि युवकांच्या सहभागातून मूल्यवर्धन साध्य करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र कार्यक्रमाला पाठबळ देण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
पशुधन उद्योगांचा विस्तार, आधुनिकीकरण
सागरी किनाऱ्यांवरील मत्स्य व्यवसायाची मूल्य साखळी बळकट करण्यासाठी स्टार्टअप्स आणि महिला गटांना बाजाराशी जोडले जाईल. तसेच पशुधन, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनासाठी एकात्मिक मूल्य साखळी निर्माण करून ‘पशुधन शेतकरी उत्पादक संघटना’ स्थापन केल्या जातील.
काजू, कोको, नारळ, चंदनासाठी विशेष मोहीम
* भारतीय काजू आणि कोकोला २०३० पर्यंत जागतिक ‘प्रीमियम ब्रँड’ बनवण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम राबवला जाईल. यामुळे कच्च्या मालाच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्ण होईल.
* भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. जुनी झाडे बदलून नवीन झाडे लावण्यासाठी नारळ प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार आहे.
* भारतीय चंदन शेतीचे वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी, केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने लक्ष केंद्रीत लागवड तसेच काढणीनंतरची प्रक्रियांना प्रोत्साहन देणार आहे.
महत्त्वाकांक्षी भारत-विस्तार प्रणाली
सीतारामन यांनी भारत-विस्तार (भारत-विस्तार- कृषी संसाधनांपर्यंत प्रवेशासाठी आभासी एकात्मिक प्रणाली) ही प्रणाली सुरू करण्याचा प्रस्ताव जाहीर केला. विस्तार ही बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधन प्रणाली म्हणून विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टल्स आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कृषी पद्धतीविषयक पॅकेजचा एआय प्रणालींसह समन्वय साधण्यात येईल. या प्रणालीमुळे शेती उत्पादकता वाढेल, शेतकऱ्यांना अधिक योग्य निर्णय घेता येतील आणि वैयक्तिकृत सल्लागार सेवा उपलब्ध करून जोखीम कमी करण्यात मदत होईल.                   

हेही वाचा