
पेडणे : गोव्यातील (Goa) पेडणे (Pernem) येथील तुये सरकारी हॉस्पिटल (Tuem Government Hospital) व संशोधन केंद्र अखेर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) (Goa Medical College (Goa)) लिंक करण्यात आले. त्यामुळे पेडणे वासियांची एक मागणी पूर्ण झाली. मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते आज या हॉस्पिटलाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर यांच्यासहीत स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) सुमारे ८५ कोटी रुपये खर्च करून ही हॉस्पिटल इमारत उभारली आहे. एकूण १०० खाटांचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलात १३ ओपीडी असणार असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून सुविधा पुरवून कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, तुये येथे उभारण्यात आलेली नवी हॉस्पिटल इमारत बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला लिंक करावी; म्हणून येथील स्थानिकांनी मोठे आंदोलने केले होते. बराच संघर्ष केल्यानंतर हे हॉस्पिटल जीएमसीला लिंक करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. आणि पेडणे वासियांची एक मागणी अखेर पूर्ण झाली.