रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली

गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक; पुढच्या गोळ्या बेडरूममध्ये जातील अशी दिली धमकी : बॉलिवूडला इशारा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक (Film Director)  रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या मुंबईतील (Mumbai) जूहू (Juhu) येथील निवासस्थानी गोळीबार केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. गोळीबारप्रकरणाची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. 

रविवारी (१ फेब्रुवारी २०२६) पहाटे सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास जूहू परिसरातील नऊ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर किमान पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यातील एक गोळी इमारतीतील जिमच्या काचेवर लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी रोहित शेट्टी घरात उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

या प्रकरणात पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसांनी सुरुवातीला पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी चार जणांना मुंबईत आणण्यात आले असून; न्यायालयाने त्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमन मरोटे (२७) व आदित्य गायकवाड (१९) (दोघेही कर्वे नगर), सिद्धार्थ येनपुरे (२०), समर्थ पोमाजी (१८) आणि स्वप्नील सकत (२३) (सर्व धायरी येथील रहिवासी) यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी या संशयितांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगितले.

गोळीबारानंतर काही तासांतच सोशल मीडियावर धमकीचे पोस्ट व्हायरल झाले. “शुभम लोणकर आणि अर्जू बिश्नोई” या नावाच्या अकाउंटवरून हे पोस्ट शेअर करण्यात आले होते. या पोस्टमध्ये लोणकरच या गोळीबारामागे असल्याचा दावा करण्यात आला असून, बिश्नोई टोळीतील हरी बॉक्सर आणि हरमन शांडू यांचीही नावे नमूद करण्यात आली आहेत. “हा केवळ ट्रेलर आहे. ऐकले नाही तर पुढच्या गोळ्या घराबाहेर नाही तर बेडरूममध्ये जातील,” अशी गंभीर धमकी या पोस्टमध्ये देण्यात आली होती. तसेच संपूर्ण बॉलिवूडला इशारा देत “मर्यादेत राहा, नाहीतर परिस्थिती बाबा सिद्दीकी यांच्यासारखी होईल,” असेही नमूद करण्यात आले होते.

या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या इमारतीबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जूहू पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक तज्ज्ञांकडून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एनसीपी नेते बाबा सिद्दीकी (वय ६६) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथील खेर नगरमध्ये गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील आरोपी म्हणून शुभम लोणकरचे नाव पुढे आले असून, या प्रकरणाचे धागेदोरेही त्याच्याकडे जात असल्याने तपास अधिक गतीने सुरू आहे.

हेही वाचा