गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते.

नाशिक : नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या कथित २ कंटेनरच्या चोरी प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर सावळा याने अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते, मात्र तो फरार झाला होता. सावळा स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक गुपिते बाहेर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून या प्रकरणाला आता नवे कायदेशीर वळण मिळाले आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथानकासारखी आहे. ऑक्टोबर महिन्यात गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेले दोन कंटेनर जात होते. या कंटेनर्समध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, गोवा-कर्नाटक सीमेवरील घाट परिसरात हे दोन्ही कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप झाला. याच कथित चोरीच्या संशयातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील संदीप पाटील यांचे अपहरण करण्यात आले होते. पाटील यांना मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि त्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांनी हाती घेतला.
संदीप पाटील यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन धायगुडे या संशयितांचा समावेश आहे. मात्र, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जाणारा सातवा आरोपी किशोर सावळा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर कायदेशीर दबावामुळे सावळा यांनी नाशिक पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. किशोर सावळा यांची चौकशी आता या प्रकरणातील सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे, कारण त्यांच्या चौकशीतून आर्थिक व्यवहारांचे मोठे धागेदोरे उघड होण्याची चिन्हे आहेत.
या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे दाट धुके साचलेले आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, प्रत्यक्षात ४०० कोटी रुपयांची चोरी झाली आहे की हे केवळ एक रचलेले बनावट कथानक आहे? तसेच, नोटाबंदी होऊन बराच काळ लोटलेला असताना दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटांचा एवढा प्रचंड साठा आला कुठून? तो गोव्यातून कर्नाटकातील एका देवस्थानासाठी नेला जात होता, या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. किशोर सावळा यांच्या चौकशीतून या गुन्ह्यातील राजकीय हस्तक्षेप, बनावट कागदपत्रे आणि मुंबई-ठाणे परिसरातील बड्या व्यावसायिकांचे हितसंबंध उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता नाशिक पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. तिकडे बेळगाव पोलिसांचा तपास देखील सुरू आहे. याच प्रमाणे सत्ताधारी कॉंग्रेस आणि विरोधक भाजपमध्ये देखील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.