विम्याचा पैसा हडपण्यासाठी केली निरपराध तरुणांची हत्या

युपीत महिला आयपीएस अधिकारी अनुकृती शर्मांनी केला 'इन्सुरेंस क्लेम सिंडीकेट'चा पर्दाफाश!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
विम्याचा पैसा हडपण्यासाठी केली निरपराध तरुणांची हत्या

संभल : संभल : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, विम्याच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी चक्क जिवंत माणसांच्या हत्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक व्याप्ती असलेल्या या विमा महाघोटाळ्याचा छडा लावण्यात २०२० च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आणि संभलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) अनुकृती शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेतील सुखवस्तू आयुष्य आणि पीएच.डी.चे शिक्षण सोडून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या अनुकृती शर्मा यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे हजारो कोटींच्या विमा फसवणुकीचे हे रॅकेट उद्ध्वस्त झाले आहे.





या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका योगायोगाने पण संशयास्पद घटनेने झाली. नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ दरम्यान उत्तर प्रदेशात दाट धुके असताना पोलीस पथक गस्तीवर होते. केवळ २० ते ३० किमी वेगाने पोलीस वाहन जात असताना अचानक एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक केले. अत्यंत कमी दृश्यमानता असताना स्कॉर्पिओ चालकाचा धोकादायक वेग पाहून अनुकृती शर्मा यांचा संशय बळावला. त्यांनी पाठलाग सुरू करून गाडी थांबवण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून सदर गाडी पकडली. झडती घेतली असता गाडीत ११ लाख ४५ हजार रुपयांची रोकड, १९ डेबिट कार्ड्स आणि एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळी ओळखपत्रे सापडली. गाडीतील संशयित करण मिश्रा याच्या चौकशीतून जे सत्य बाहेर आले, त्याने अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली.





एकंदरीत प्रकार पाहून हा एक महाघोटाळा आहे यांची एव्हाना सर्वांनाच कल्पना आलेली होती. या महाघोटाळ्याची कार्यपद्धती (Modus Operandi) अत्यंत भयानक आणि सुनियोजित होती. ही टोळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब, अशिक्षित आणि गंभीर आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना लक्ष्य करत होती. कॅन्सरसारख्या आजाराने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तींच्या नावावर ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचे आयुर्विमा (Life Insurance) काढत असे. यासाठी रुग्णांना निरोगी भासवले जायचे. विमा प्रतिनिधी आणि दलाल स्वतः प्रीमियमचे पैसे भरत असत, कारण त्यांना माहिती होते की संबंधित व्यक्तीचा मृत्यू लवकरच होणार आहे. या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपन्यांकडून मिळणारी मोठी रक्कम हे दलाल स्वतः हडप करत असत आणि मृताच्या कुटुंबाला केवळ काही हजार रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले जायचे.





मात्र, या टोळीचा क्रूरपणा केवळ आजारी व्यक्तींपर्यंत थांबला नाही. विम्याच्या रकमेसाठी या टोळीने अनेक सुदृढ तरुणांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर विमा काढून तिची हत्या केली जायची आणि हा मृत्यू 'अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेला अपघात' असल्याचे भासवले जायचे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस तपासात त्रुटी ठेवून या फाईल्स अपघाती मृत्यू म्हणून बंद केल्या गेल्या होत्या. अनुकृती शर्मा यांनी जुन्या आणि बंद झालेल्या १७ एफआयआर पुन्हा उघडल्या, तेव्हा त्यात हत्येचे ४ धक्कादायक गुन्हे उघडकीस आले. गुन्हेगारांनी चक्क २९ बनावट मृत्यू प्रमाणपत्रे तयार केली होती, तर काही अस्सल प्रमाणपत्रांवरील तारखांमध्ये फेरफार करून विम्याचा दावा सादर केला होता.

या महाघोटाळ्याचे धागेदोरे उत्तर प्रदेशसह मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, बिहार आणि आसाम अशा १२ राज्यांपर्यंत पसरलेले आहेत. विमा कंपन्या ज्या त्रयस्थ कंपन्यांना (Third Party Agencies) विम्याची पडताळणी करण्यासाठी कंत्राट देतात, त्या कंपन्यांचे कर्मचारीच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार निघाले. पकडलेला संशयित करण मिश्रा हा 'फर्स्ट सोल्यूशन सर्व्हिसेस' नावाच्या कंपनीत तपास अधिकारी म्हणून काम करत होता. विमा दाव्यांची सत्यता तपासण्याचे काम त्याच्याकडे होते, त्यामुळे तोच स्वतः बनावट दावे मंजूर करून घेत असे. या साखळीत ग्रामप्रधान, सचिव, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे, जे पैशांच्या बदल्यात बनावट मृत्यू दाखले आणि वैद्यकीय अहवाल पुरवत असत.


Fake Documents, Murders: How Fraudsters Ran Rs 100 Crore Insurance Scam In  Uttar Pradesh's Sambhal



आयपीएस अनुकृती शर्मा यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तांत्रिक कौशल्याचा वापर केला. संशयितांच्या मोबाईलमधून ३०,००० हून अधिक फोटोंचा डेटा जप्त करण्यात आला असून, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समधून पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे मिळाले आहेत. आरोपींनी नामांकित व्यक्तींच्या नावावर बँक खाती उघडली होती, ज्यांचे डेबिट कार्ड्स आणि सिम कार्ड्स स्वतः आरोपीच वापरत असत. विमा कंपन्यांकडून जमा होणारा पैसा थेट या खात्यांमध्ये येत असे. या तपासादरम्यान आतापर्यंत ५२ जणांना अटक करण्यात आली असून, ५० हून अधिक आरोपी अद्याप फरार आहेत.


खौफनाक साजिश... बीमा के करोड़ों रुपये, क्लेम के लिए अपनों का कत्ल, झकझोर  देगी संभल में पकड़े गए इस गैंग की करतूत - sambhal case shock you Insurance  policies fraud claim murder crime gang caught ips anukriti sharma lclam -  AajTak



या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सक्तवसुली संचालनालयाने (ED) या तपासात रस दाखवला असून, पैशांच्या अफरातफरीचा छडा लावण्यासाठी सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात 'हवाला'मार्फत व्यवहार झाले असण्याची दाट शक्यता असून, तपास यंत्रणा आता त्या दिशेने काम करत आहेत. विमा कंपन्यांची १०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली असून हा आकडा तपासाच्या अंती आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका महिला अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि जिद्दीमुळे केवळ सरकारी तिजोरीचे नुकसान टळले नाही, तर विमा हडपण्यासाठी लोकांचे बळी देणारे एक अमानवी रॅकेट संपुष्टात आले आहे. या कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनातील भ्रष्ट साखळीचे स्वरूपही उघड्यावर आले आहे.

हेही वाचा