विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५० टक्के मतांचा संकल्प करा

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
48 mins ago
विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर ५० टक्के मतांचा संकल्प करा

पणजी : भाजप पदाधिकाऱ्यांनी गोवा विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकण्यासाठी आराखडा तयार केला आहे. कार्यकर्ते आणि बूथ स्तरीय पदाधिकाऱ्यांनी याची काटेकोर अंमलबजावणी करावी. २०२७ च्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर किमान ५० टक्के मते मिळतील, असा संकल्प करावा, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला. शनिवारी पणजीत झालेल्या कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे व अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते.

नितीन नवीन म्हणाले की, गोवा भाजपसाठी शुभ आहे. २०१२ मध्ये येथे भाजप सत्तेवर आला आणि २०१४ मध्ये केंद्रात सत्ता मिळाली. त्यानंतरही हा क्रम सुरूच राहिला आहे. २०२७ च्या राज्याच्या आणि २०२९ च्या देशाच्या निवडणुकीत देखील भाजपचे कमळ फुलणार आहे. गेल्या १४ वर्षांत गोव्यात भाजपने अनेक विकासकामे केली आहेत. येथे विमानतळ, महामार्ग, उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. भाजप सरकार 'अंत्योदय' तत्त्वावर काम करत आहे. सुशासन देण्यासह राष्ट्रनिर्माणाचे काम देखील भाजप करत आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी 'डबल इंजिन' सरकारने केलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवावा. भाजप सरकारने गोव्यामध्ये ३३ हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे जनतेला सांगावे. त्याचवेळी पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती द्यावी. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्तीला १४ वर्षे उशीर कोणत्या नेत्यामुळे झाला, हे देखील त्यांना सांगावे. शिस्त, समर्पण आणि निर्धाराने पक्षसंघटनेसह देशाला पुढे नेण्याचे काम करूया. राजकारण हे मॅरेथॉनसारखे आहे, येथे वेगापेक्षा स्टॅमिना महत्त्वाचा असतो, हे समजून घ्यावे, असे नबीन यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, नितीन नबीन हे भाजपचे नवीन मार्गदर्शक आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. भाजपच्या 'डबल इंजिन' सरकारने केलेली विकासकामे आणि अंत्योदय तत्त्वावर केलेल्या कामामुळे २०२७ मध्ये गोव्यात पुन्हा भाजप सरकार येणार, याची आम्हाला खात्री आहे. महापालिका, नगरपालिका आणि फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत देखील भाजप विजयी होईल.

२०२७ मध्ये २७ जागांचे ध्येय

दामू नाईक म्हणाले की, नितीन नबीन यांनी दोन दिवस केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २७ जागा जिंकणे, हे आपले ध्येय आहे. सलग चौथ्यांदा गोव्यात भाजप सरकार आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ती भेट देऊयात.

हेही वाचा