साळगाव कचरा प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी

स्थानिकांचा दावा : दैनंदिन जीवनावर परिणाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
36 mins ago
साळगाव कचरा प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी

म्हापसा : साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना दररोज मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रकल्पावरील ताण कमी करण्यात सरकार अपयशी ठरल्याने दुर्गंधीयुक्त प्रदूषणाचा थेट परिणाम रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर होत असून, प्रदूषणमुक्त वातावरणाचे सरकारचे आश्वासन केवळ स्वप्न ठरले आहे, असा आरोप समस्याग्रस्त स्थानिकांनी केला आहे.
यावेळी मारियो कोर्देरो यांनी सांगितले की, हा कचरा प्रकल्प मूळतः कळंगुट आणि साळगाव मतदारसंघातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आला होता. एका शिफ्टमध्ये दररोज १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प नंतर संपूर्ण बार्देश तालुक्यातील समुद्रकिनारी भागाचा कचरा सामावून घेण्यासाठी दोन शिफ्टमध्ये चालविण्यात आला. सध्या मात्र संपूर्ण गोव्यातील कचरा स्वीकारण्यासाठी प्रकल्पाची क्षमता २५० टीपीडी (टन प्रति दिन) इतकी वाढवण्यात आली आहे. ही वाढ प्रकल्प उभारणीवेळी सरकारने साळगाववासीयांना दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.
भारतीय संविधानातील कलम २१ नुसार नागरिकांना स्वच्छ व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा हक्क आहे. मात्र या कचरा प्रकल्पातून सतत येणाऱ्या दुर्गंधीमुळे साळगाववासीयांना नीट जेवण करणेही अशक्य होत आहे, अशी गंभीर बाब कोर्देरो यांनी उपस्थित केली.
प्रकल्पाला सुरुवातीपासूनच ​विराेध
दरम्यान, प्रदीप पाडगावकर यांनी सांगितले की, साळगावातील नागरिकांनी या कचरा प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला होता. आज निर्माण झालेली परिस्थिती पूर्वीच अपेक्षित होती; मात्र लोकांच्या इच्छेकडे दुर्लक्ष करून प्रकल्प उभारण्यात आला. सध्या गोव्यात सर्वत्र कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून, विशेषतः दक्षिण गोव्यात अत्यावश्यक असलेले कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याचा फटका साळगाववासीयांना सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा