
पणजी : गोव्यातील (Goa) चिंबल येथील युनिटी मॉल (Unity Mall) आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही प्रकल्प वेगवेगळ्या खात्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे दोन्ही प्रकल्प स्थलांतरीत करण्याविषयीचा आदेश पर्यटन संचालक (Tourism Director) कसे जारी करू शकतात? असा प्रश्न करीत चिंबल (Chimbel) ग्रामस्थांनी पत्राविषयी राग व्यक्त केला. प्रकल्प स्थलांतरीत करण्याविषयी आदेश योग्य पद्धतीने येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय चिंबल ग्रामस्थांनी घेतला.
युनिटी मॉलच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या चिंबल ग्रामस्थांनी शुक्रवारी जुने गोवा येथील गांधी चौकात सभा घेतली. या सभेत चिंबल जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर, अजय खोलकर, कॉंग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव आणि इतरांची भाषणे झाली.
चिंबल ग्रामस्थांचे महाआंदोलन शुक्रवारी आझाद मैदानावर होणार होते. मात्र, सरकारने बीएनएसएस खाली १६३ कलम लागू केल्याने; ही सभा जुने गोवा येथील गांधी चौकात घेण्यात आली. सभेला अडथळा आणण्यासाठी कलम १६३ कलम लागू केल्याने; आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.
युनिटी मॉल प्रकल्प पर्यटन खात्याच्या अखत्यारीत येतो. प्रशासन स्तंभ प्रकल्प सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या (जीएडी) अखत्यारीत येतो. दोन्ही प्रकल्प वेगवेगळे असताना पर्यटन संचालक दोन्ही प्रकल्पांच्या स्थलांतरणाचे आदेश कसा जारी करू शकतात? प्रशासन स्तंभ स्थलांतरणाचा आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी करायला हवा. पर्यटन संचालकांनी स्थलांतरणाविषयी जारी केलेले पत्र आम्हाला मान्य नाही, असे जैवविविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.
स्थलांतरणाविषयीची अधिसूचना जारी करावी : युरी आलेमाव
युनिटी मॉलच्या कोनशिलेवर २५ कोटी रुपये खर्च करणे हा एक विक्रम ठरतो. कॉंग्रेस पक्षाचा आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प स्थलांतरीत केले असल्याचे मुख्यमंत्री जाहीरपणे का सांगत नाहीत. जाहीरपणे सांगण्याची त्यांना लाज का वाटते? प्रकल्प स्थलांतरीत केल्याविषयीची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी कॉंग्रेस विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी केली.