मैत्रिणीला गोव्यात जाण्यापासून रोखण्यासाठी बॉम्ब ठेवल्याचा कॉल

संशयिताविरोधात कोकण रेल्वे पोलिसांकडून गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
मैत्रिणीला गोव्यात जाण्यापासून रोखण्यासाठी बॉम्ब ठेवल्याचा कॉल

मडगाव : गोव्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची खोटी माहिती देणार्‍या संशयित प्रदीप कुमार (सध्या रा. नागपूर, मूळ रा. भोपाळ) याच्याविरोधात कोकण रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मैत्रिणीला गोव्यात फिरायला जाण्यापासून रोखण्यासाठी संशयिताने हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले.

पुष्पा चौरे नावाची महिला गोव्यात ३ किलो वजनाचा बॉम्ब ठेवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती देणारा कॉल मुख्यमंत्री हेल्पलाईनवर आला होता. त्याबाबत २९ जानेवारी रोजी दुपारी २.२५ वाजता पणजी नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोकण रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथकाने तातडीने मडगाव आणि थिवी रेल्वे स्थानकांवर संयुक्त शोध मोहीम राबवली. मात्र, तपासाअंती कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

कॉल्स रेकॉर्डनुसार मिळालेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेण्यात आली असता सदर क्रमांक मूळ भोपाळ मध्यप्रदेश येथील व सध्या नागपूर (महाराष्ट्र) येथील प्रदीप कुमार याचा असल्याचे समजले. यानंतर केलेल्या चौकशीत पुष्पा चौरे ही प्रदीप कुमार याची मैत्रीण असून तिला गोव्यात पर्यटनासाठी जायचे होते. पण प्रदीपला तिला गोव्याला जायला द्यायचे नव्हते. तिचा प्लान रद्द करण्याच्या हेतूने प्रदीप कुमारने बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुणाल वेर्लेकर यांच्या तक्रारीनुसार कोकण रेल्वे पोलिसांनी संशयित प्रदीप कुमार याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एडविन डायस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

कणकवलीत महिलेच्या सामानाची तपासणी

संशयित प्रदीप कुमार याने रेल्वेतून गोव्यात येणार्‍या पुष्पा चौरे यांची माहिती दिली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलासह पोलिसांनी प्रवास करणार्‍या महिलेला व तिच्यासोबतच्या सात महिलांना कणकवली स्थानकावर उतरवून त्यांच्या सामानाची तपासणी केली. परंतु त्यांच्याकडे कोणतीही संदिग्ध गोष्ट आढळली नाही. प्रदीप कुमार याने गोव्याला जाण्यापासून रोखण्यासाठी चुकीची माहिती दिल्याची माहिती महिलेने दिली.