सौरभ लुथरा, गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण

निवाडा ५ फेब्रुवारीला : हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th January, 11:43 pm
सौरभ लुथरा, गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण

म्हापसा : हडफडे येथील बर्च क्लब दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ लुथरा व गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी या अर्जावरील निवाडा येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला आहे.

बुधवार, २८ रोजी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेली या जामिनावरील सुनावणी पुर्ण झाली. दोन्ही पक्षाकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आले. सरकारी आणि बचाव पक्षाने आपापले मुद्दे मांडत या न्यायलयासमोर कागदी व इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करत बाजू मांडली.

गौरव लुथरा याच्याबाजूने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. सुबोध कटंक तर सौरभ लुथरा याच्यावतीने अ‍ॅड. पराग राव यांनी बाजू मांडली व आपल्या अशीलांचा जामीन अर्ज मंजूर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षाकडून वकील अ‍ॅड. जेनिफर सांतामारिया यांनी युक्तिवाद करत हा अर्ज फेटाळण्याची विनंती केली.

बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, सरकारी पक्षाचा संपूर्ण भर केवळ क्लबमधील कथित बेकायदा बाबींवर आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग दुर्घटनेच्या दिवशी क्लबमध्ये वापरण्यात आलेल्या कथित कृत्रिम इलेक्ट्रॉनिक आतषबाजी (कोल्ड पायरो) मुळे लागली असेल, तर ती आतषबाजी आपल्या अशीलांनी पेटवलेली नव्हती. ती नृत्य कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी वापरली होती. मात्र, पोलीस तपासात त्याचा उल्लेख नाही किंवा त्या कलाकारांना अद्याप अटकही करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद लुथरा बंधूंच्या वकिलांनी केला.

घटनेच्या दिवशी लुथरा क्लबस्थळी हजर नव्हते. त्यामुळे आपल्या अशीलांना या दुर्घटनेला थेट जबाबदार धरता येणार नाही. अर्जदार हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे या घटनेशी नवनवीन गोष्टी समोर येत असल्याचा सरकारी पक्षाच्या दावा अर्थहीन आहे. क्लबसाठी व्यापार परवाना हा जागेचे मूळ मालक सुरेंद्रकुमार खोसला यांनी मिळवला होता. त्यांच्याकडून करारपत्रानुसार आपले अशील क्लब चालवत होते. तसेच सदर संरचना ही अर्जदारांनी बांधली नव्हती. न्यायालयाने अटी घालून दिल्यास आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करू. असे सांगून लुथरा बंधूंचा जामीन अर्ज मंजूर करावा, अशी मागणी अ‍ॅड. कंटक व अ‍ॅड. राव यांनी न्यायालयाकडे केली.

या क्लबसाठी बोगस दस्ताऐवज व बनावटगिरी करण्यात आली आहे, असे मुद्दे मांडत सरकारी वकील सांतामारीया यांनी संशयितांचा जामीन नामंजूर करण्याची विनंती युक्तीवादावेळी न्यायालयाकडे केली.

जामीन मंजूर करण्यास आक्षेप

क्लबच्या उत्पन्नांचे संशयित लुथरा बंधू हे थेट लाभार्थी आहेत. क्लबच्या संरचनेला नगरनियोजन (टीसीपी) खात्याची तांत्रिक मंजुरी नव्हती. बर्च क्लबस्थळी अग्नीरोधक उपकरणे नव्हती. प्रत्यक्षदर्शी आणि क्लबच्या काही कर्मचार्‍यांच्या पोलीस जबाबातून हे अधोरेखित होते, असे सांगत सरकारी वकिलांनी जामीन नामंजूर करण्याची विनंती केली.