माजी सरपंच रोशन रेडकरच्या पोलीस कोठडीत वाढ

बर्च क्लब दुर्घटना : रघुवीर बागकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
माजी सरपंच रोशन रेडकरच्या पोलीस कोठडीत वाढ

म्हापसा : साकवाडी हडफडे येथील बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी माजी सरपंच रोशन रेडकर याच्या पोलीस कोठडीत ६ दिवसांची वाढ करण्यात आली. तर, बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश म्हापसा न्यायालयाने दिला.

बनावट आरोग्य दाखला प्रकरणी अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावरील सुनावणी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत तर म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी १० फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.

गुरुवार, २९ रोजी हणजूण पोलिसांनी रेडकर व बागकर यांना म्हापसा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने रेडकर याच्या पोलीस कोठडीत ६ दिवसांनी वाढ केली. बागकर याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात केली. रोशन रेडकर याला २२ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर, रघुवीर बागकर याला १६ जानेवारी रोजी अटक केली होती.

दरम्यान, बर्च बाय रोमियो लेन क्लबसाठी अबकारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट दाखला सादर केल्याप्रकरणी संशयित आरोपी अजय गुप्ता याच्या जामीन अर्जावर गुरुवार २९ रोजी म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयात सुनावणी झाली. संशयिताच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर न्यायालयाने ही सुनावणी शनिवार, ३१ जानेवारीपर्यंत तहकूब केली. त्या दिवशी सरकारी वकील बाजू मांडणार आहेत.

दरम्यान, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी, बर्च बाय रोमियो लेनमधील क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचे जीव गेले होते. याप्रकरणात हणजूण पोलिसांनी लुथरा बंधूंसह आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे.

लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी १० फेब्रुवारीपर्यंत तहकूब

बर्च बाय रोमियो लेन क्लबसाठी मिळविलेल्या बनावट आरोग्य दाखला प्रकरणी संशयित गौरव लुथरा व सौरभ लुथरा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवार, २९ रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही सुनावणी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली. ३० डिसेंबर रोजी या प्रकरणी संशयित लुथरा बंधूंना न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी लांबण्यासह संशयितांना न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाल्यामुळे या प्रकरणातील म्हापसा पोलिसांचे तपासकार्य ठप्प झाले आहे. 

हेही वाचा