भेसळयुक्त दारू तस्करीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार शैलेश जाधव अटकेत

न्यायालयाकडून सात दिवस पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th January, 11:56 pm
भेसळयुक्त दारू तस्करीचा पर्दाफाश; मुख्य सूत्रधार शैलेश जाधव अटकेत

पणजी : गुन्हा शाखेने एशियन पेंटच्या नावाखाली गोव्यातून बेळगावमध्ये होणार्‍या भेसळयुक्त दारू तस्करीचा ६ डिसेंबर २०२५ रोजी पर्दाफाश केला होता. त्यात सुमारे १ कोटी रुपयांची बनावट दारू जप्त केली होती. या प्रकरणी गुन्हा शाखेने सांगली - महाराष्ट्र येथून मुख्य सूत्रधार शैलेश जाधव याला अटक केली आहे. मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली.

गोव्यातून बेळगावकडे भेसळयुक्त दारू घेऊन ट्रक जात असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी मेरशी येथे जुने गोवे बायपास रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी पथकाने एमएच १० सीआर १८३९ क्रमांकाच्या ट्रकला अडवून त्याची झडती घेतली. त्या ट्रकच्या मागच्या बाजूने एशियन पेंटच्या पिशव्या ठेवल्या होत्या. या पिशव्यांच्या आडून ही दारू तस्करी केली जात असल्याचे समोर आले. त्यावेळी पथकाला १,४९८ विविध ब्रॅण्डच्या दारूच्या पेट्या सापडल्या. त्यामध्ये सुमारे ४८ हजार दारुच्या बाटल्या होत्या. ही सर्व दारू तसेच २५ किलोच्या एशियन पेंटच्या ३५ पिशव्या, मोबाईल फोन व इतर साहित्य मिळून गुन्हा शाखेने १ कोटी रुपयांचा माल जप्त केला. याच दरम्यान पथकाने अधिक चौकशी केली असता, संबंधित यंत्रणेकडून आवश्यक परवानगी न घेता आणि सरकारला आवश्यक शुल्क न भरता संसर्गजन्य रोग पसरवू शकणारी तसेच मानवी जीवनाला धोका निर्माण करणारी भेसळयुक्त दारू वाहतूक होत असल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा शाखेने याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम आणि गोवा, दमण आणि दीव उत्पादन शुल्क कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून ट्रक चालक हुसेन साब मुल्ला (३५, रा. बिजापूर कर्नाटक) याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, सांगली - महाराष्ट्र येथील शैलेश जाधव याने ट्रक देऊन वरील माल बेळगावमध्ये देण्याची सूचना केल्याची माहिती दिली.

सांगलीतून आवळल्या संशयिताच्या मुसक्या

पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सांगली - महाराष्ट्र येथील शैलेश जाधव याच्या मुसक्या आवळून गोव्यात आणले. त्यानंतर त्याला अटक करून मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयिताला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.