कॅडिलॅक डायमंड कॅसिनोवर जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाचा छापा

कॅसिनो अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th January, 11:47 pm
कॅडिलॅक डायमंड कॅसिनोवर जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाचा छापा

पणजी : जीएसटी इंटेलिजेन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) गोवा विभागाने मंगळवारी रात्री कदंब पठारावरील हाॅटेल डबल ट्री हिल्टन मधील कॅडिलॅक डायमंड या कॅसिनोवर छापा टाकला. कारवाई दरम्यान डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दस्तऐवज आणि इलेक्ट्रॅानिक उपकरणे जप्त केली. तसेच पुढील चौकशीसाठी कॅसिनोच्या अधिकाऱ्यांना समन्स जारी करण्यात आले आहे.

कॅसिनोकडून मोठ्या प्रमाणात जीएसटी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तसेच करचुकवेगिरी होत असल्याची माहिती डीजीजीआयच्या गोवा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता हाॅटेल डबल ट्री हिल्टन मधील कॅडिलॅक डायमंड या कॅसिनोवर छापा टाकला. त्यावेळी पथकाने कॅसिनोतील रोख रक्कम ठेवलेल्या तिजोरीची तपासणी केली. तसेच कॅसिनोच्या व्यवहार संदर्भातील कागदपत्रे आणि इतर दस्तावेज जप्त केले. याशिवाय कॉम्प्युटर हार्ड डिस्क, तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १२.३० वाजता संपली. डीजीजीआयचे पाच पुरुष आणि दोन महिला मिळून सात अधिकाऱ्यांनी कारवाई केली. दरम्यान, पुढील चौकशीसाठी कॅसिनोच्या अधिकाऱ्यांना समन्स जारी करून डीजीजीआयच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.