दोघे गंभीर जखमी : इनोव्हा- रेनॉल्ट क्विड कारची धडक

जोयडा : गोवा–रामनगर राष्ट्रीय महामार्गावर रामनगरजवळील अस्तोली परिसरात दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात रुद्रय्या शिवण्णावर व त्यांची बहिण रेणुका यांचा मृत्यू झाला आहे. तसेच रुद्रय्या यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले.
गोव्याहून हुबळीच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार आणि हुबळीहून गोव्याकडे येणारी रेनॉल्ट क्विड कार यांच्यात हा अपघात झाला. रेनॉल्ट क्विड कारमध्ये चालकाच्या शेजारी बसलेले रुद्रय्या शिवण्णावर (वय ७७) हे वाहनात अडकून जागीच ठार झाले. कारच्या मागील आसनावर बसलेली त्यांची बहिण रेणुका हिरेमठ (वय ६०) हिला रामनगर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.
अपघातात वाहनचालक शिवराज शिवण्णावर (वय २८) तसेच बसवा शिवण्णावर (वय ७०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना प्रथम रामनगर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून, पुढील उपचारासाठी बेळगाव येथे हलवण्यात आले आहे.
अपघात लोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असला तरी रामनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महंतेश नाईक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रेनॉल्ट क्विड कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
हा अपघात रस्त्यावरच्या सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे किंवा अचानक वेगाने वाहन चालवल्यामुळे झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि अपघाताची नेमकी कारणे शोधत आहेत.
मृत, जखमी फोंडा येथे वास्तव्यास
मृत व जखमी हे मूळचे हुबळी तालुक्यातील लक्ष्मेश्वर येथील रहिवासी असून, सध्या गोव्यातील फोंडा येथे वास्तव्यास होते. इनोव्हा कारमधील प्रवासी तीन दिवसांचा गोव्याचा प्रवास आटोपून हुबळीकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.