
म्हापसा : भाटी बादे येथे शापोरा नदीकिनारी खुबे काढण्याचे काम करत असताना नदीच्या पाण्यात पडून विनायक मांद्रेकर (वय ५०, रा. हुडो मार्ना, शिवोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विनायक मांद्रेकर हे नेहमीप्रमाणे शापोरा नदीकिनारी खुबे काढण्यासाठी गेले होते. काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते नदीच्या पाण्यात पडले. पाण्यात पडताच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार जवळच उपस्थित असलेल्या इतर लोकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेऊन विनायक यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ शिवोली येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर विनायक यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्वप्नील नाईक पुढील तपास करीत असून, अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.