सुयश-यशच्या अर्धशतकांमुळे गोवा भक्कम स्थितीत

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
सुयश-यशच्या अर्धशतकांमुळे गोवा भक्कम स्थितीत

पणजी : रणजी ट्रॉफी एलिट गटातील सामन्यात केरळ संघाविरुद्ध गोव्याने पहिल्या दिवसअखेर ८३.४ षटकांत ८ बाद २७९ धावा करत भक्कम धावसंख्या उभारली. गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमी, पर्वरी येथे सुरू असलेल्या या प्रथम श्रेणी सामन्यात सुयश प्रभुदेसाई आणि पदार्पणवीर यश कसवणकर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गोव्याची धावसंख्या सावरली.
गोव्याच्या डावाला सुयश प्रभुदेसाई याने भक्कम आधार दिला. त्याने संयमी खेळी करत १७२ चेंडूंमध्ये ८६ धावा केल्या. या खेळीत त्याने १० चौकार लगावले. सुरुवातीला झटपट गडी बाद झाल्यानंतर सुयशने डाव सावरत मधल्या फळीत ६० धावांची सर्वाधिक भागीदारी रचली आणि संघाला स्थैर्य मिळवून दिले.
गोव्याची सुरुवात मात्र सावध झाली. कश्यप बखले (१२) आणि अभिनव तेजराणा (१) हे दोघेही लवकर बाद झाले. अंकित शर्माने टप्प्याटप्प्याने टाकलेल्या अचूक मार्‍यामुळे गोव्याच्या फलंदाजांना अडचणीत आणले. कर्णधार स्नेहल कवठणकर याने ५० चेंडूंमध्ये २९ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र तो बेसिल याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
मधल्या फळीत अष्टपैलू ललित यादव (२१) आणि पदार्पणवीर यश कसवणकर (५०) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कसवणकरने संयमी अर्धशतकी खेळी करत गोव्याला २०० धावांचा टप्पा पार करून दिला, जरी नियमित अंतराने गडी बाद होत राहिले तरी खालच्या फळीत अर्जुन तेंडुलकर याने आक्रमक खेळी करत ३९ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार लगावून धावगती वाढवली. दर्शन मिसाळ (२२) यानेही उपयुक्त योगदान दिले, तर यष्टीरक्षक समर दुभाषी पहिल्या दिवसअखेर ११ धावांवर नाबाद आहे. कौशिक व्ही. आणि अमूल्य पांड्रेकर अजून फलंदाजीस यायचे आहेत.
गोलंदाजीमध्ये अंकित शर्मा हा सर्वात प्रभावी ठरला. त्याने ३३.४ षटकांत ८८ धावा देत ५ गडी बाद केले. नेदुमनकुझी बेसिल याने चांगली साथ देत ५५ धावांत २ गडी, तर सचिन बेबी याने १ गडी बाद केला. गोव्याने मजबूत पायाभरणी केली असून दोन गडी शिल्लक असल्याने दुसर्‍या दिवशी ३०० धावांचा टप्पा ओलांडण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.