म्हापसा, पर्वरी घरफोड्यांतील टोळीच्या म्होरक्याला मध्य प्रदेशात अटक

४२ लाखांचा ऐवज लुटला होता; मध्यप्रदेश येथे गोवा पोलीस पथकावर सशस्त्र हल्ला

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
म्हापसा, पर्वरी घरफोड्यांतील टोळीच्या म्होरक्याला मध्य प्रदेशात अटक

 म्हापसा : गोव्यातील (Goa) बार्देश तालुक्यातील (Bardez) सुकूर-पर्वरी आणि पेडे - म्हापसा येथील घरफोडीमध्ये ४२ लाखांचा ऐवज लुटण्यात आला होता. या प्रकरणी अलीराजपूर मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील कुख्यात टोळीच्या म्होरक्या हिरासिंग डोंगरसिंग बामनिया (३८ वर्षे, रा. माल फलिया, बेहडिया) याला पर्वरी (Porvorim) पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपीला सोडवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी गोवा पोलीस (Goa Police) पथकाच्या गाडीवर सशस्त्र हल्ला चढवला. या हल्ल्यात एका उपनिरीक्षकासह दोघे पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच वाहनाचे नुकसान झाले.

 घरफोडीच्या या घटना शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडल्या होत्या. सुकूर पर्वरीतील देवश्री ग्रीन इमारतीमधील किरण म्हांबरे यांचा फ्लॅट फोडून दीड लाखांच्या रोख रक्कमेसह १५ सोन्याची नाणी मिळून एकूण ६ लाखांचा मुद्देमाल लंपास झाला होता. घटनेच्यावेळी म्हांबरे कुटूंब हे मुंबईला गेले होते.

 पेडे, म्हापसा येथील प्रूडेंशीयल पाल्म या इमारतीमधील फिर्यादी वैभव गावडे व वैदिक श्रीवास्तव यांचे दोन फ्लॅट फोडले होते. गावडे यांच्या फ्लॅटमधून १२ लाखांचे दागिने तर श्रीवास्तव यांच्या फ्लॅटमधून २३ लाखांचे सुवर्णलंकार मिळून ३५ लाखांचा ऐवज चोरण्यात आला होता. घटनेच्यावेळी फिर्यादी गावडे कुटूंब हे बाहेरगावी गेले होते. तर वैदिक श्रीवास्त हा वास्कोतील बिट्स पिलानीमध्ये होता.

हा चोरीचा प्रकार उघडकीस येताच पर्वरी तसेच म्हापसा पोलिसांनी फिर्यादींच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात चोरांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या सखोल चौकशी वेळी वरील चोरीमध्ये मध्य प्रदेश राज्यातील अलीराजपूर जिल्ह्यातील टोळीचा समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पर्वरीचे उपनिरीक्षक सीताराम मळीक आणि कॉन्सटेबल भिकाजी परब आणि म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बाबलो परब, कॉन्सटेबल प्रविण पाटील व पुंडलिक आरोसकर हे गोवा पोलीस पथक मध्यप्रदेशमध्ये पाठवण्यात आले.

 या पथकाने अलीराजपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि बोरी पोलीस स्थानकाशी समन्वय साधला. त्यानंतर गुरूवारी २९ रोजी पहाटे बोरी पोलिसांच्या सहाय्याने गोवा पोलीस पथकाने बाहाडिया गावात छापा टाकला. संशयित हिरासिंग बामनिया याला याची चाहूल लागताच त्याने जंगलामध्ये धाव घेतली. पोलीस पथकाने संशयिताचा जवळपास १ किलोमीटर अंतरावर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

 नंतर अटकेची ओपचारिकता पूर्ण करण्यात आली. सायंकाळी संशयिताला गोव्यात आणण्यासाठी बोरी पोलीस स्थानकापासून सुमारे २० किलो मीटर अंतरावर असलेल्या जोबट प्रथमश्रेणी न्यायालयात ट्रांझिट रिमांडसाठी घेऊन जाताना गोवा तसेच स्थानिक पोलिसांच्या वाहनांवर संशयिताच्या १५ ते २० दुचाकीस्वार साथीदारांनी सशस्त्र हल्ला चढवला. हल्लेखारांनी दगडफेकीसह कोयता आणि दंडूक्यांचा वापर केला. वाहनाला अडवून संशयिताला या हल्लेखारांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोवा पोलिसांनी धैर्याने प्रत्यूत्तर दिल्याने ते यशस्वी होऊ शकले नाही. या हल्ल्यात गोवा पोलीस पथकातील पोलिसांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक पोलिसांची अतिरीक्त कुमक आल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

संशयिताला घेऊन पथक गोव्यात

दरम्यान, गोवा पोलिस पथक शुक्रवारी दुपारी विमानमार्गे संशयिताला घेऊन गोव्यात दाखल झाले. त्यानंतर पर्वरी पोलिसांनी वरील गुन्ह्यात संशयित आरोपी हिरासिंग याला रितसर अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.  

सहकार्याबद्दल मध्य प्रदेश पोलिसांचे आभार

 या सराईत  गुन्हेगाराला पकडून गोव्यात आणण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी पुरेशी सुरक्षा पुरवली. ज्यामुळे गोवा पोलीस पथकाची सुरक्षा सुनिश्चित झाली. या तत्काळ मदत आणि सहकार्याबध्दल गोवा पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांचे गोवा पोलिसांनी आभार व्यक्त केले. तर गोवा पोलीस पथकाने दाखवलेले धैर्य आणि शौर्याचे कौतुक केले आहे.  

 संशयिताविरुद्ध अनेक गुन्हे नोंद      

संशयित आरोपी हिरासिंग बामनिया हा घरफोडीतील सराईत गुन्हेगार आहे. या टोळीचा हिरासिंग हा म्होरक्या असून; आपल्या साथीदारांसह देशातील विविध भागात घरफोडी करून रोख रक्कम  आणि सुवर्णलंकार लंपास केली आहे. संशयिताविरूध्द याप्रकरणी अनेक गुन्हे नोंद आहेत. 


हेही वाचा