राज्यात ९२ ठिकाणी ‘एआय ट्राफीक सिग्नल कॅमेरा’ बसवणार

पी. प्रविमल अभिषेक : नियम पाळणे हे नागरिकांचे कर्तव्य

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
9 hours ago
राज्यात ९२ ठिकाणी ‘एआय ट्राफीक सिग्नल कॅमेरा’ बसवणार

मडगाव : तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करुन वाहतूक नियम न पाळणार्‍यांवर लक्ष ठेवण्यावर भर दिलेला आहे. कारवाई ही पुराव्यांवर आधारीत असावी यासाठी वाहतूक खात्याकडून ( Transport Department)  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD)  सहकार्यातून राज्यात ‘एआय बेस ट्रॅफिक सिग्नल व कॅमेरा’ बसवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात राज्यात ९२ ठिकाणी याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती वाहतूक खात्याचे संचालक पी. प्रविमल अभिषेक यांनी दिली.

मडगाव येथील गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालय यांच्या सहकार्यातून वाहतूक खात्याकडून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाहतूक संचालक पी. प्रविमल अभिषेक, कारे कायदा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मारिया गोरेटी सिमोईस, दक्षिण गोवा वाहतूक अधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई, वाहतूक खात्याचे राजेश नाईक. भालचंद्र सावंत उपस्थित होते.

यावेळी वाहतूक संचालक अभिषेक यांनी सांगितले की, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना मडगाव येथील गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. रस्ता सुरक्षा जनजागृतीपर कार्यक्रम वाहतूक संचालनालय, वाहतूक पोलीस यांच्याकडून आयोजित केले जातात. रस्ता सुरक्षा जनजागृतीचे कार्यक्रम दरवर्षी केले जातात. हे कार्यक्रम समाजातील रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी वारंवार आठवण करून देण्यासाठी आहेत. मात्र, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे, वेगावर नियंत्रण ठेवणे व वाहन चालवताना लेनचे नियम पाळणे या गोष्टी पाळणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रस्त्याची इंजिनिअरींग चांगली असावी लागते. बांधकाम खात्याकडून रस्ता ऑडिट केले जात असून ब्लॅक स्पॉटवर आवश्यक दुरुस्ती, गतिरोधक, फलक उभारणी आदी उपाययोजना केल्या जात आहेत. याशिवाय गाड्या चालवण्यासाठी योग्य आहेत का याची तपासणी करण्यासाठी ऑटोमेटेड केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. तर वाहन चालकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी जागृतीसह कारवाई केली जात आहे. मात्र, वाहन चालकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन कर्तव्य म्हणून बजावण्याची गरज आहे, असे संचालक अभिषेक म्हणाले.

एआय बेस कॅमेर्‍यांमुळे नियम उल्लंघनांवर लक्ष 

 रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यासाठी वाहतूक खात्याकडूनही मोहिमा राबवण्यात येत असतात. वाहनचालकांना शिस्त लागण्यासाठी या मोहीम सुरू केल्या आहेत. एआय बेस ट्रॅफिक सिग्नल कॅमेर्‍यांमुळे वाहतूक पोलीस घटनास्थळी नसले तरीही गाडीच्या मॉडिफिकेशनपासून इतर रस्ता नियमांच्या उल्लंघनापर्यंत लक्ष राहणार आहे व नियम उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई होणार आहे.

कदंबकडून २०० इलेक्ट्रिक बसेसची मागणी

सार्वजनिक दळणवळण सेवा चांगल्या होण्यासाठी कदंब महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. कदंब महामंडळाकडून केंद्र सरकारकडे सुमारे २०० इलेक्ट्रिक वाहने मिळावीत यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहिली जात आहे, असे संचालक पी. प्रविमल अभिषेक यांनी सांगितले. 

रस्ता नियमांचे पालन न केल्याने अपघात 

राज्यातील रस्ता अपघातांबाबतच्या उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील जास्त अपघात हे मानवी चुकांमुळे होत आहेत. यात रस्ता सुरक्षा नियमांचे पालन न करणे, हेल्मेट परिधान न करणे व इतर नियमांचे उल्लंघन हे आहेत. वाहतूक पोलीस व पोलीस दिवसरात्र रस्त्यांवर उभे राहून कारवाई करू शकत नाहीत. त्यामुळे एआय बेस ट्राफीक सिग्नल कॅमेरा हा चांगला पर्याय आहे. पणजी स्मार्टसिटीतील कॅमेरा सध्या सुरु आहेत, जर काही ठिकाणी देखभालीचा प्रश्न असेल तर त्याकडे लक्ष दिले जाईल, असेही वाहतूक संचालक पी. प्रविमल अभिषेक म्हणाले.

हेही वाचा